“BJP-RSS ने देशात हिंसा अन् द्वेषच पसरवला”; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 13:50 IST2024-02-06T13:49:51+5:302024-02-06T13:50:28+5:30
Bharat Jodo Nyay Yatra: झारखंडमधून आता भारत जोडो न्याय यात्रा ओडिसामध्ये प्रवेश करणार आहे.

“BJP-RSS ने देशात हिंसा अन् द्वेषच पसरवला”; भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधींची टीका
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. मणिपूरपासून सुरू झालेली ही यात्रा मुंबईपर्यंत येणार आहे. आताच्या घडीला भारत जोडो न्याय यात्रा झारखंडमध्ये आहे. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली. भाजपा आणि आरएसएसने देशात हिंसा आणि द्वेषच पसरवला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
झारखंडनंतर राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ओडिशा राज्यात प्रवेश करेल. स्थानिकांमध्ये या यात्रेबाबत प्रचंड उत्सुकता आणि उत्साह असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. राहुल गांधींनी सायकलवरून कोळसा घेऊन जाणाऱ्या तरुणांची भेट घेतली. यावेळी त्यांनी २०० किलो कोळसा भरलेली सायकल चालवली. त्यांनी त्या मजुरांना पीकअप व्हॅन देण्याचे आश्वासन दिले.
एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे, हाच या यात्रेचा उद्देश
भाजप आणि आरएसएसने देशात द्वेष आणि हिंसाचार पसरवला आहे, हे आमच्या लक्षात आले. त्यामुळे तुम्हा सर्वांसोबत एकत्र येण्याचा विचार केला, एकत्र येऊन तुमचे प्रश्न सोडवायचे. हा भारत जोडो न्याय यात्रेचा उद्देश आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तत्पूर्वी, झारखंडमध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला रामगढ येथील महात्मा गांधी चौकातून सुरुवात केल्यानंतर ते बोलत होते.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास देशव्यापी जात-आधारित जनगणना करण्याचे आणि आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढून टाकण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, काँग्रेसने बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत आरोप केला की, देशात नोकऱ्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, तिने गेल्या दहा वर्षांतील कळस गाठला गेला आहे.