‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 02:31 AM2019-12-14T02:31:00+5:302019-12-14T02:32:37+5:30

मोदींमुळे ईशान्य भारत संकटात

Congress Rahul Gandhi has said that he will never apologize for the Rap in India statement | ‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

‘रेप इन इंडिया’वरून संसदेत गदारोळ; माफी मागण्यास राहुल गांधींचा नकार

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मेक इन इंडियाची भाषा करीत असले तरी भारतात सध्या सर्वत्र बलात्कार होत आहेत ते पाहता एखाद्याला हा देश रेप इन इंडिया वाटू शकतो या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजपच्या खासदारांनी लोकसभेत शुक्रवारी प्रचंड गदारोळ घातला तर राज्यसभेत महिला खासदारांनी या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी भाजपने मागणी केली. मात्र माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला असून मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका राहुल गांधी यांनी घेतली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत लावून धरली असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही सत्ताधारी व विरोधी बाकांवरून सुरू असलेला गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकुब केले.

गदारोळामुळे प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृति इराणी म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी वादग्रस्त उद्गार काढून महिला व भारतीय जनतेचा अपमान केला आहे. लोकांनी बलात्कार करण्यास प्रवृत्त व्हावे असे उद्गार त्यांनी काढले आहेत. सर्व पुरुष बलात्कारी नसतात. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही काही भाजप सदस्यांनी लोकसभाध्यक्षांकडे केली.

राज्यसभेतही गोंधळ

ईशान्य भारतातील तणावग्रस्त स्थितीवर राज्यसभेत शून्य प्रहरात काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी विचार मांडले. त्यावेळी प्रख्यात नृत्यांगना व खासदार सोनल मानसिंग यांनी राहुल गांधी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली. राहुल यांचे उद्गार देशातील महिलांचा अपमान करणारे आहेत असा आक्षेप सत्ताधारी पक्षाच्या महिला खासदारांनी घेतला. त्यांनी गदारोळ माजविला. मात्र राहुल गांधी हे राज्यसभेचे सदस्य नसून त्यामुळे त्यांचा नामनिर्देश करता येणार नाही असे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सांगितले.

मोदी यांनीच माफी मागावी : राहुल गांधी

रेप इन इंडिया वक्तव्याबद्दल मी कधीही माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत दिल्ली ही बलात्काराची राजधानी बनली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. त्याचा जुना व्हिडिओ मोदी यांनी पुन्हा पाहावा असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य भारताला आगीच्या खाईत लोटले आहे. हाच सध्याचा ज्वलंत प्रश्न असून त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जात आहे. ईशान्य भारताला संकटात टाकल्याबद्दल, भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त केल्याबद्दल मोदी यांनी माफी मागितली पाहिजे.

जनतेच्या भावना दुखावल्या : राजनाथसिंह

राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यामुळे केवळ लोकसभेच्याच नव्हे तर देशातील साºया जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा सदस्यांना लोकसभेत राहाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी केली.
राहुल गांधी यांनी देशाच्या सद्य:स्थितीवर साधेसरळ वक्तव्य केले असून त्यांनी माफी मागण्याची आवश्यकता नाही, असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.

Web Title: Congress Rahul Gandhi has said that he will never apologize for the Rap in India statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.