Rahul Gandhi : "आजच्या एका सिलिंडरची किंमत..."; दरवाढीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 03:32 PM2022-05-08T15:32:55+5:302022-05-08T15:51:47+5:30
Congress Rahul Gandhi : सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. केंद्राने सर्वसामान्यांना घरगुती गॅस दरवाढीचा दणका दिला असून, महागाईच्या भडक्यात तेल ओतले आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ सरकारने जाहीर केली. त्यामुळे देशातील जवळपास सर्वच ठिकाणी १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी एक हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. सिलिंडरच्या दरवाढीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
काँग्रेस पक्षच गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भल्यासाठी काम करतो असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतींची तुलना केली आहे. "काँग्रेसच्या काळात २०१४ पर्यंत एलपीजी सिलिंडरची किंमत ८२७ रुपये अनुदानासह ४१० रुपये होती, तर २०२२ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये ती ९९९ रुपयांपेक्षा जास्त आहे आणि सबसिडी देखील शून्य आहे" असं म्हटलं आहे.
LPG Cylinder
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2022
Rate Subsidy
INC (2014) ₹410 ₹827
BJP (2022) ₹999 ₹0
2 cylinders then for the price of 1 now!
Only Congress governs for the welfare of poor & middle class Indian families. It’s the core of our economic policy.
"आजच्या एका सिलिंडरची किंमत काँग्रेसच्या काळातील दोन सिलिंडरच्या किमतीएवढी आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीय कुटुंबांच्या भल्यासाठी फक्त काँग्रेसच काम करते. हा आपल्या आर्थिक धोरणाचा गाभा आहे" असं देखील राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन महिन्यामध्ये ही दुसरी दरवाढ आहे. यापूर्वी २२ मार्चला इंधन विक्री करणाऱ्या कंपन्यांनी ५० रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढविले होते. तर मे महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर १०२.५० रुपयांनी वाढविले होते. राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९९९.५० तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपये झाली आहे.
किचन बजेट कोलमडणार
गेल्या काही दिवसापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत. मात्र, सरकारने घरगुती गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांचा खिसा पुन्हा हलका केला आहे. पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ गॅसचे दरदेखील उच्चांकी पातळीवर आहेत. इंधनाच्या उच्चांकी दरामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती महाग झाल्या आहेत. त्यातच या दरवाढीमुळे जनतेचे बजेट कोलमडणार आहे. सर्वच स्तरातून गॅस दरवाढीवर नाराजी व्यक्त करण्यात येत असून, दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.