“आज नाही तर उद्या सत्याचा विजय हा होतोच; माझा मार्ग मोकळा झाला, आता पुढे...”: राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 06:12 PM2023-08-04T18:12:20+5:302023-08-04T18:13:47+5:30
Rahul Gandhi Press Conference: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राहुल गांधी यांनी अगदी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
Rahul Gandhi Press Conference: मोदी आडनाव प्रकरणात राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राहुल गांधी यांच्यासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना खासदारकीही परत मिळणार आहे. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर भाष्य केले.
या पत्रकार परिषदेत अधीर रंजन चौधरी, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासह अन्य काही जण उपस्थित होते. आनंदाचा दिवस आहे. सत्यमेव जयते. सत्याचा विजय झाला. लोकशाहीचा विजय झाला. हा केवळ राहुल गांधी यांचा विजय नाही, तर देशातील जनतेचा विजय झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. संविधान अजून जिवंत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले. न्याय मिळू शकतो. हा सामान्य माणसाचाही विजय आहे, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करायला किती वेळ लागतो ते पाहू
जो सत्यासाठी लढतो, देशाच्या ताकदीसाठी लढतो, तरुणांसाठी बोलतो, महागाईशी लढतो. लोकांना जागरुक करण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी फिरले. गरीब, मुले, डॉक्टर आणि इंजिनियर यांना भेटले. त्या सगळ्यांच्या प्रार्थना आमच्या पाठीशी होत्या. हा जनतेचा विजय आहे, असे सांगताना, राहुल गांधी यांचे सदस्यत्व २४ तासांत रद्द ठरवले. २४ तासांत सगळी सूत्रे हलली. आता राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यासाठी किती वेळ लागतो, ते पाहू. आम्ही वाट पाहू, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी स्पष्ट केले.
पुढे काय करायचे याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत
राहुल गांधी यांनीही पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा सत्याचा विजय होतो. माझा मार्ग मोकळा आहे. माझे काम काय आहे, मला पुढे काय करायचे आहे, याबाबत माझे विचार स्पष्ट आहेत. ज्या ज्यो लोकांनी सहकार्य केले, त्यांना खूप खूप धन्यवाद, अशा मोजक्या शब्दांत राहुल गांधी यांनी भाष्य केले.