“ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे”; राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:37 IST2025-04-07T17:33:43+5:302025-04-07T17:37:07+5:30
Congress Rahul Gandhi News: अमेरिकेने भारतासह विविध देशांवर 'जशास तसे' शुल्क आकारल्यानंतर भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कोसळला. यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे”; राहुल गांधींची टीका
Congress Rahul Gandhi News: सोमवारचा दिवस भारतीयांसाठी एकामागून एक धक्के देणारा ठरला. सकाळी शेअर बाजारात हाहाकार उडाल्याचे पाहायला मिळाले. सेन्सेक्स ३००० अंकांनी घसरला तर निफ्टीने १२०० अंकांनी खाली आला. मात्र, बंद होताना बाजार काहीसा सावरला. या धक्क्याने गुंतवणूकदारांचे १९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेचे तीव्र पडसाद जगासह भारतीय शेअर बाजारावर उमटल्याचे पाहायला मिळाले. यातच पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात केंद्र सरकारने दोन रुपयांची वाढ जाहीर केली. तसेच त्यानंतर लगेचच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली.
केंद्र सरकारने इंधनावरील केंद्रीय उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लीटर दोन रुपयांनी वाढले आहे. ८ एप्रिलपासून हे लागू होणार आहे. केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे सचिव धीरज शर्मा यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. तसेच एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची झालेली वाढ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) लाभार्थी आणि गैर-लाभार्थी दोघांनाही लागू आहे. सुधारित किमती ८ एप्रिलपासून लागू होणार आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेवरून काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला, भारताने आता वास्तव स्वीकारावे
ट्रम्प यांनी भ्रमाचा भोपळा फोडला आहे. वास्तव आता समोर आले आहे. अशा परिस्थितीला सामोरे जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसत नाहीत. भारताने आता वास्तवाचा स्वीकार केला पाहिजे. सर्व भारतीयांसाठी काम करणारी लवचिक, उत्पादन-आधारित अर्थव्यवस्था उभारण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही, अशी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, अमेरिकेने भारतासह विविध देशांवर 'जशास तसे' शुल्क आकारल्यामुळे भारतात महागाई वाढण्याची किंवा बेरोजगारीची कोणतीही जोखीम नाही, असे मत विविध अर्थतज्ज्ञांनी मांडले आहे. उलट यामुळे जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढविण्याची भारताला ही संधी असल्याचे या अर्थतज्ज्ञांना वाटते. विकसनशील देशांच्या संशोधन व माहिती प्रणालीचे (आरआयएस) महासंचालक सचिन चतुर्वेदी यांनी सांगितले की, या शुल्कवाढीनंतर भारतीय किंवा जागतिक अर्थव्यवस्थांविषयी इतक्यात भाष्य करणे घाईचे ठरेल. जे देश प्रामुख्याने फक्त अमेरिकेशीच व्यापार करतात त्या देशांवर याचा अधिक परिणाम होऊ शकतो.