“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 04:16 PM2023-07-27T16:16:25+5:302023-07-27T16:17:35+5:30

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मोदी मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल करत, ते फक्त निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.

congress rahul gandhi slams bjp rss and modi govt over manipur violence | “BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

“BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील”; राहुल गांधींची PM मोदींवर घणाघाती टीका

googlenewsNext

Congress Rahul Gandhi On Manipur Violence: मणिपूरमधील हिंसाचारावरून सत्ताधारी मोदी सरकार आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. मणिपूरमधील घटनेवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर घणाघाती टीका केली आहे. एक व्हिडिओ शेअर करत राहुल गांधी यांनी मणिपूर घटनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरले. 

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. देशाचा एक भाग जळतोय तरीही देशाचे पंतप्रधान गप्प कसे? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली आहे. मणिपूरमध्ये काय घडतेय, ते संपूर्ण देश बघतोय. परंतु पंतप्रधानांनी मणिपूरबद्दल एक शब्दही काढला नाही. देशाचा एक प्रदेश जळत असतांना देशाच्या पंतप्रधानांनी काहीतरी बोलले पाहिजे. विमानाने जाऊन कमीत कमी लोकांशी चर्चा करतील, असे वाटत होते. परंतु नरेंद्र मोदी गप्प आहेत, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला. 

BJP-RSSला फक्त सत्ता हवी, त्यासाठी देशही जाळतील

नरेंद्र मोदी हे आरएसएसचे पंतप्रधान आहेत, त्यांना मणिपूरशी काही देणेदेघणे नाही. त्यांना माहिती आहे की, त्यांच्या विचारधारेमुळेच मणिपूर जळत आहे. मणिपूरमध्ये महिलांवर जो अन्याय होतोय, तेथील जनतेच्या सुख, दुःखाची काळजी मोदींना नाही. मोदींना काहीही फरक पडत नाही, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फक्त आणि फक्त सत्ता हवी आहे आणि त्यासाठी ते देशही जाळायला मागेपुढे पाहणार नाहीत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. तुमच्या मनात जर देशभक्ती आहे, तर जेव्हा देश दुखावतो, देशाचा कोणताही नागरिक दुखावतो तेव्हा तुम्हालाही दुःख होते. मात्र, भाजप-RSSच्या लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण ते भारताचे विभाजन करण्याचे काम करत आहेत, असे टीकास्त्र राहुल गांधींनी सोडले.

दरम्यान, विरोधी आघाडीने INDIA हे नाव निवडले. आम्ही हे नाव निवडताच नरेंद्र मोदी याला शिव्या देऊ लागले. मोदीजींना इतका अहंकार आहे की, ते INDIA या पवित्र शब्दावर टीका करत आहेत, असे सांगत, काँग्रेसचे पंतप्रधान असते तर तिथेच बसले असते. मागे होऊन गेलेले कोणतेही पंतप्रधान असते तर अशी वेळ आली नसती. या परिस्थितीत पंतप्रधान कधी बोलतात, याची वाट पाहावी लागली नसती. मात्र, देशाचे पंतप्रधान मणिपूरबद्दल का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे कारण ते निवडक लोकांचे पंतप्रधान आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली.
 

Web Title: congress rahul gandhi slams bjp rss and modi govt over manipur violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.