"ते घाबरले आहेत पण देश नाही, भारत गप्प बसणार नाही"; राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 01:53 PM2021-02-15T13:53:28+5:302021-02-15T13:58:04+5:30

Congress Rahul Gandhi And Modi Government : राहुल गांधी यांनीही काही घटनांचा उल्लेख कर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Disha Ravi arrest | "ते घाबरले आहेत पण देश नाही, भारत गप्प बसणार नाही"; राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका

"ते घाबरले आहेत पण देश नाही, भारत गप्प बसणार नाही"; राहुल गांधींची मोदी सरकारवर बोचरी टीका

googlenewsNext

नवी दिल्ली - पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) हिला अटक केल्यानंतर आता राजकारण तापलं आहे. अटकेनंतर मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं जातं आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही काही घटनांचा उल्लेख कर मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बोल कि सच ज़िंदा है अब तक असं म्हणत पंतप्रधान आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. 

राहुल गांधी यांनी "बोल कि लब आज़ाद हैं तेरे, बोल कि सच ज़िंदा है अब तक!"ओळी पोस्ट केल्या आहेत. तसेच ते (मोदी सरकार) घाबरले आहेत, पण देश घाबरलेला नाही. भारत गप्प बसणार नाही असा इशारा देखील राहुल गांधी यांनी मोदी सरकारला दिला आहे. यासोबतच राहुल यांनी काही घटनांच्या बातम्या देखील ट्विट केल्या आहे. यामध्ये ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दिशाच्या बातमीसह पत्रकाराला देण्यात आलेली धमकी व ट्विटरच्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याची बातमीही ट्विट केली आहे.

...अन् दिशा रवीची थेट अजमल कसाबसोबत तुलना, भाजपा नेत्याचं 'ते' ट्विट जोरदार व्हायरल

भाजपाच्या एका नेत्याचं ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये नेत्याने अजमल कसाब सोबत दिशा रवीची तुलना केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेता आणि बंगळुरू सेंट्रलचे खासदार पीसी मोहन (PC Mohan) यांनी दिशा रवीची तुलना थेट 26/11च्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि बुरहान वानीसोबत केली आहे. पीसी मोहन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे, "बुरहान वानीदेखील 21 वर्षाचा होता. अजमल कसाबही 21 वर्षाचा होता. वय ही फक्त एक संख्या आहे. कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. कायद्याला आपलं काम करू द्या. गुन्हा हा नेहमी गुन्हाच असतो" असं मोहन यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी #DishaRavi असं देखील लिहिलं असून दिशा रविचा एक फोटोही ट्वीट केला आहे. भाजपा नेत्याच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण?

दिशा रवी 22 वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं 2018 मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं 2019 मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते. हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.

"मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी अन् आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत", राहुल गांधींचं टीकास्त्र

राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राजस्थानमधील अजमेर येथे राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. "मोदींनी देशाला भूक, बेरोजगारी व आत्महत्या हे तीन पर्याय दिलेत" असा घणाघात राहुल यांनी यावेळी केला आहे. काँग्रेसने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. राजस्थानमधील रुपनगढ येथे राहुल गांधी यांनी किसान महापंचायतीला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली देखील काढली. राहुल गांधींनी ट्रॅक्टरवर बसून या रॅलीची सुरुवात केली. "कृषी कायदे लागू करणं हे बेरोजगारीचं कारण ठरेल. पंतप्रधान म्हणत आहेत की ते पर्याय देत आहे. हो त्यांनी दिला आहे. भूक, बेरोजगारी आणि आत्महत्या. ते शेतकऱ्यांची चर्चा करू इच्छितात, मात्र ते तोपर्यंत बोलू शकणार नाहीत जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत. शेती भारत मातेची आहे. उद्योजकांची नाही" असं राहुल यांनी म्हटलं आहे.

Web Title: Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Disha Ravi arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.