काँग्रेस ‘वंचित’शी आघाडीच्या तयारीत; राहुल गांधी यांचे राज्यातील नेत्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 06:01 AM2019-06-30T06:01:58+5:302019-06-30T06:05:03+5:30
राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दोन सत्रांत चर्चा केली.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवनानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीशी समझोता करण्याचा आग्रह धरला आहे. येत्या ३ जुलैपासून माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील ‘वंचित’च्या नेत्यांशी जागावाटपाची चर्चा करतील. समाधानकारक प्रस्ताव देऊ न आघाडी करा, असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले आहेत.
राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांची दोन सत्रांत चर्चा केली. या बैठकीस विजय वडेट्टीवार, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, हुसेन दलवाई आदी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला. मुस्लीम व दलित मतदार पक्षापासून दुरावला, असे विश्लेषण स्थानिक नेत्यांनी राहुल गांधी यांच्यासमोर केले.
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास काँग्रेसच्या इतर सहकारी पक्षांना नेमक्या किती जागा देणार, हा प्रश्न मात्र आजच्या या बैठकीनंतरही अनुत्तरित राहिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे व गवई गट) आदी पक्षांना
या जागावाटपात ‘वंचित’ राहण्याची शक्यता असल्याने त्यांचीही नाराजी दूर करावी लागेल, अशी भीती एका ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केली. राज्यातील नेतृत्वबदलावर बैठकीत चर्चा झाली नसल्याचा दावा सूत्रांनी केला.