हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 11:46 PM2024-09-16T23:46:17+5:302024-09-16T23:47:27+5:30
महिलांना दरमहा ३०००, शेतकऱ्यांना दरमहा ४०००... वाचा कुणाला काय-काय?
Jammu Kashmir Election, Congress Manifesto: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने या जाहीरनाम्याला 'अब बदलेगा हालात' असे नाव दिले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा आणि तारिक हमीद कारा यांनी जाहीरनाम्याचे वाचन करताना सांगितले की, गेल्या १० वर्षांपासून अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की काश्मिरी जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला आहे. पण आता सर्व समस्या संपण्याची वेळ आली आहे. आमच्याकडे टीम आहेत. आम्ही त्यांच्यामार्फत इनपूट गोळा केले आहेत आणि आम्ही त्यालाच लोकांचा जाहीरनामा म्हणतो.
#WATCH | Srinagar, J&K: Congress party launches their party manifesto for the upcoming Jammu and Kashmir Elections 2024 pic.twitter.com/IG6WM9gipi
— ANI (@ANI) September 16, 2024
पवन खेडा पुढे म्हणाले की, लोकांना त्यांच्या व्यथा मांडायला कोणीच नाही. कारण इथे थेट दिल्लीची सत्ता आहे. काश्मीर हे स्वप्नांचे कब्रस्तान बनले आहे. जाहीरनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले की, हा दस्तऐवज केवळ आश्वासनांचा ढीग नाही, तर आम्ही अधिकारांवरही भर देऊन बोलतो. कारण संपूर्ण राज्यघटना अधिकार आणि कर्तव्यांवर आधारित आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करताना पक्षाने रोजगार, महिला आणि प्रशासनाबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्यात.
महिलांसाठी घोषणा
पक्षाने जाहीरनाम्यात महिलांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा ३,००० रुपये दिले जातील. 'सखी शक्ती' अंतर्गत प्रत्येक महिलेला बचत गटाकडून ५ लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल. यासोबतच सर्व पोलीस ठाण्यात महिला पोलीस सेल स्थापन करण्यात येतील.
रोजगारासंदर्भात घोषणा
रोजगाराबाबत, काँग्रेस सरकार तरुणांना एका वर्षासाठी दरमहा ३,५०० रुपयांपर्यंतचा बेरोजगारी भत्ता देईल, असे आश्वासन पक्षाने दिले आहे. याशिवाय अनेक विभागांमध्ये रिक्त असलेली १ लाख सरकारी पदे भरली जातील. रिक्त सरकारी जागा भरण्यासाठी आम्ही ३० दिवसांच्या आत जॉब कॅलेंडर देखील जारी केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना दरमहा ४ हजार रुपये मिळणार
शेतकऱ्यांबाबत घोषणा करताना काँग्रेसने म्हटले की, सरकार आल्यास भूमिहीन शेतकरी किंवा भाड्याच्या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसेल. सरकार त्यांना चार हजार रुपयांची मदत करणार आहे. शेती करणाऱ्या भूमिहीन शेतकऱ्यांसाठी सरकार ९९ वर्षांच्या लीजची व्यवस्था करेल. तर सफरचंद पिकासाठी किमान ७२ रुपये प्रतिकिलो दर निश्चित केला जाईल. याशिवाय, नैसर्गिक आपत्तींविरूद्ध सर्व पिकांसाठी १०० % पीक विमा देखील दिला जाईल.