“लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही”; राहुल गांधींची BJP-RSS वर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 10:52 AM2023-09-22T10:52:51+5:302023-09-22T10:56:16+5:30
Rahul Gandhi: राहुल गांधी म्हणाले की, होय. विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद आहेत, पण...
Rahul Gandhi: विरोधकांची इंडिया आघाडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS ला भारताच्या संस्थानांवर नियंत्रण मिळवू देणार नाही. लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही. ही लढाई संपलेली नाही. अनेक जण या लढाईत सहभागी झाले आहेत. ही लढाई आम्ही जिंकू, असा विश्वास खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका करताना दिसतात. यातच काँग्रेसने राहुल गांधी यांचा नॉर्वेतील एक व्हिडिओ एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी भाजप आणि आरएसएसवर निशाणा साधताना दिसत आहेत. विरोधी आघाडीतील सहभागी सर्व पक्षांची हीच भावना आहे की, लोकशाहीची हत्या सहन केली जाणार नाही. देशाच्या संस्थांवर आरएसएसला ताबा मिळवू देणार नाही, यावरही सर्वांचे एकमत असल्याचे राहुल गांधी या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
शिक्षण, आरोग्यावर सरकारने लक्ष देणे गरजेचे
भारतात दोन ते तीन घराण्यांची एकाधिकारशाही आहे. कोट्यवधी लोक गरीब झाले आहेत. सरकारने शिक्षण, आरोग्य यावर भर देणे गरजेचे आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्यक समाज विकासाच्या प्रवाहात सहभागी झालेले नाहीत, असा आरोपही राहुल गांधी यात केल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, विरोधकांच्या इंडिया आघाडीत मतभेद असल्याचे राहुल गांधी यांनी मान्य केले.
दरम्यान, देशातील काही राज्यांत इंडिया आघाडीत मतभेद आहेत. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे ध्येय समोर ठेवून इंडिया आघाडी कार्यरत आहे. महात्मा गांधी, गौतम बुद्ध आणि गुरु नानक यांच्या विचारांवर चालणारा भारत देश आहे. देशाच्या भविष्याचा विचार करून वैचारिक संघर्ष केला जात आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.