सोनिया गांधी यांच्या सहभागाने ‘भारत जोडो यात्रे’त चैतन्य; कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 05:29 AM2022-10-07T05:29:24+5:302022-10-07T05:29:58+5:30
सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांडवपुरा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो यात्रा’ गुरुवारी कर्नाटकात असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यात सहभाग घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. सोनिया गांधी यांनी गुरुवारी सकाळी मांड्या जिल्ह्यात राहुल गांधी आणि पक्षातील इतर ज्येष्ठ नेत्यांसह काही किलोमीटर ‘भारत जोडो यात्रे’त सहभाग घेतला.
कर्नाटकात लवकरच निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनीही पदयात्रेत भाग घेतला. ७५ वर्षीय सोनिया गांधी आणि राहुल गांधी सोबत चालतानाची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत.
आतपर्यंत अनेक वादळे पचवली…
यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी ‘आतापर्यंत आम्ही अनेक वादळे पचवली आहेत. आजही आम्ही भारताच्या एकतेसाठी सर्व आव्हानांच्या सीमा पार करू,’ असे फोटोसह ट्विट केले. हे ट्विट काँग्रेसतर्फे रिट्विट करण्यात आले आहे. राहुल गांधी यांची ही यात्रा आणखी १५ दिवस कर्नाटकात राहणार आहे.
दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी
सोनिया गांधी यांच्या सहभागामुळे पदयात्रेतील कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. सोनिया गांधी यांना पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी दुतर्फा नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे सुरक्षा पथकाची मात्र तारांबळ उडत होती. आधी त्या यात्रेत ३० मिनिटे सहभागी होणार होत्या. परंतु, नंतर त्यांनी पदयात्रेत दोन तास सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेस नेते कंटेनरमध्ये झोपताहेत
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्यांमधून जाणार आहे. त्यात राहुल गांधी यांनी ३५७० किमी चालण्याची योजना आखली आहे. यात्रेच्या माध्यमातून भाजपचे "विभाजनाचे राजकारण" देशापुढे आणणे हा त्यांचा उद्देश आहे. यात्रेदरम्यान राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेते अनेक वेळा कंटेनरमध्ये झोपले. त्यांच्या या निर्धारातून पक्ष कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"