अमेठीत काँग्रेसला मोठा झटका, स्मृती इराणींच्या उपस्थितीत विकास अग्रहरी यांचा भाजपात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 02:52 PM2024-04-18T14:52:31+5:302024-04-18T14:53:25+5:30
Lok Sabha Elections 2024 : विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
अमेठी : लोकसभा निवडणुकीपूर्वी अमेठीतकाँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्षांनी विकास यांचा पक्षात समावेश केला. युवा वर्गात मजबूत पकड असलेले विकास अग्रहरी यांची जिल्ह्यात दमदार वक्ता म्हणून ओळख आहे. विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी २६ एप्रिलनंतर अमेठीत येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे अमेठीतील काँग्रेस दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. अमेठी लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराची प्रक्रिया सुरूच आहे. विकास अग्रहरी यांचा केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जगदीशपूर विधानसभेच्या राणीगंज बाजारपेठेतील रहिवासी विकास अग्रहरी हे खंबीर प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते.
भाजपाचे जिल्हा प्रवक्ते चंद्रमौली सिंह म्हणाले की, अमेठीतील सर्व सामान्य जनता स्मृती इराणी यांच्यासोबत आहे. गेल्या १० वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीशी बांधलेले नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यामुळेच लोक आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये येत आहेत. दरम्यान, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारताना विकास अग्रहरी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीचा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.
हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य - राहुल गांधी
भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी बुधवारी सांगितले आहे. दरम्यान,राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते.
अमेठीबाबत काँग्रेसचा अद्याप सस्पेंस
यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसने राहुल गांधींना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे. मात्र अमेठीबाबत अद्याप सस्पेंस कायम आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींच्या पराभवापूर्वी अमेठी ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला मानली जात होती. कारण राहुल गांधी यांनी २००४, २००९ आणि २०१४ मध्ये या जागेवरून लोकसभा निवडणूक जिंकली होती. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींना उमेदवारी दिली जाऊ शकते, असेही म्हटले जात आहे.