विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 05:51 AM2019-02-04T05:51:47+5:302019-02-04T05:51:50+5:30

देशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.

Congress strong after winning assembly in MP | विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

विधानसभा जिंकल्याने काँग्रेसमध्ये चैतन्य; भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली !

Next

- प्रसाद कुलकर्णी

देशाच्या हृदयस्थानी असलेले मध्यप्रदेश हे राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेश व महाराष्ट्राप्रमाणेच महत्त्वाचे राज्य आहे. एके काळी मध्यप्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाई. असे; पण येथेही अनेक राजकीय स्थित्यंतरे घडत गेली.

मध्य प्रदेशात लोकसभेचे २९ लोकसभा मतदारसंघ आहेत. गेल्या लोकसभा निवडणकुीत मोदी लाटेत भाजपाने त्यापैकी तब्बल २७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला २ जागाच मिळाल्या. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी लाटही राज्यात राहिलेली नाही आणि मतदारही पर्यायाच्या शोधात आहेत. त्याचे द्योतक म्हणजे हल्लीच पार पडलेल्या विधानसभा निवडणुका. सुमारे पंधरा वर्षे येथे भाजपाची सत्ता होती. पण यंदा २३० पैकी ११४ जागांवर मुसंडी मारून काँग्रेसने पुनरागमन केले. भाजपानेही जोरदार लढत देत १०९ जागा मिळवल्या आणि अन्यांना ७ जागा मिळाल्या. राहुल गांधी यांच्या प्रचाराची छाप निवडणूक निकालांवर स्पष्ट दिसून आली.
राज्यातील पराभवाने भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापुढे कायमच देशात भाजपाची सत्ता राहणार आहे नि देश सतत मोदींच्या भाषणांना भुलणार आहे, अशा दिवास्वप्नात राहणाऱ्या भाजपाची धुंदी या निकालांनी खाडकन उतरली. खडबडून जाग आलेला भाजपाही आता तयारीला लागला असून राज्याचे प्रभारी स्वतंत्रदेव सिंह व सहप्रभारी सतीश उपाध्याय यांनी भाजपाच्या खासदारांचा साडेचार वर्षांचा लेखाजोखा तयार केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकांत जनतेचा कौल मिळूनही चांगले काम करण्याची संधी काही जणांनी सत्तेच्या उन्मादात दवडली. भाजपाचच्या २७ पैकी १० खासदारांची कामगिरी अतिशय वाईट असल्याचा अहवाल प्रभारींनी श्रेष्ठींना पाठविला आहे. हे उमेदवार पुन्हा उभे राहिले तर नक्कीच आपटणार; याचा अंदाज प्रभारींना स्पष्टपणे आला. त्यामुळे त्या १0 जणांचा पत्ता ‘कट’ होणे निश्चित मानले जात आहे. याचा फायदा विधानसभेत पराभूत झालेल्या भाजपच्या काही नेत्यांना होण्याची शक्यता आहे. अनेक नेते यामुळे मनात गाजरे खात आहेत. मध्यंतरी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे विधानसभेत हरलेल्या सहा मंत्र्यांना आता लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. भाजपाने २९ जागांना आता १० प्रभागांत विभागले असून पद्धतशीरपणे प्रचार यंत्रणा राबविण्याची तयारी चालवली आहे.

दुसरीकडे विधानसभेतील यशामुळे काँग्रेसमध्ये चैतन्य संचारले आहे. लोकसभेच्या २९ पैकी किमान २० ते २२ जागा जिंकण्याची उमेद काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळगून आहेत. धार, खरगोन, मंडला, शाहडोल, रतलाम- झाबूआ, बैतूल या जागांवर काँग्रेस विशेष जोर देत आहे. हा सर्व आदिवासी पट्टा आहे. या परिसरातील ४७ पैकी ३१ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसने विजय मिळवला आहे. सध्या या भागात केवळ रतलाममध्येच काँग्रेसचा खासदार आहे.

छिंदवाडा ही जागा काँग्रेसची परंपरागत जागा मानली जाते. गुनामध्ये ज्योतिरादित्य शिंदे हे तगडे उमेदवार काँग़्रेसकडे आहेत. धार आणि
मंडला लोकसभा मतदारसंघांतील आठपैकी सहा विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला विजय मिळाला. बैतूलमध्ये भाजपा व काँग्रेसचे समसमान बल आहे. यामुळे येथे चुरशीची लढत होऊ शकते. शाहडोलमध्येही हीच परिस्थिती आहे, कारण बैतूल व शाहडोल या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत या दोन्ही पक्षांचे आठपैकी प्रत्येकी चार आमदार आहेत. बालाघाटमध्ये आठपैकी सहा आमदार काँग्रेसचे आहेत. विधानसभेतील हे यश पुन्हा मिळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. खरगोन, ग्वाल्हेर व मुरैनामध्ये तर आठपैकी सात आमदार काँग्रेसचे आहेत. भिंडमध्ये काँग्रेसचे पाच आमदार आहेत.

मलासुद्धा खासदार व्हायचंय!
अद्याप नावांच्या प्राथमिक याद्यांवरच चर्चा होत आहे; पण हौशे, नवशे, गवशे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या मागे फिरून ‘लोणी लावणेही’ सुरू आहे. आपल्या मागे जनमत व कार्यकर्त्यांची फौज आहे, असे भासविण्याचा काही जणांचा आटापिटाही सुरू आहे; पण फारच कमी जागा अशा आहेत की, जेथे या प्रमुख पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. बाकी घोडामैदानाला काहीसा वेळ आहे.

Web Title: Congress strong after winning assembly in MP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.