चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:58 PM2022-09-17T16:58:03+5:302022-09-17T17:01:21+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं.

congress takes jibe on pm narendra modi cheetah project | चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण

चित्ता इव्हेंट केवळ 'तमाशा', 'भारत जोडो' यात्रेवर निघालाय आमचा खरा वाघ!; काँग्रेसनं करुन दिली 'ती' आठवण

Next

नवी दिल्ली-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशात कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियाहून आणलेल्या चित्त्यांना सोडण्यात आलं. तब्बल ७० वर्षांनंतर भारतात चित्त्यांनी पाऊल ठेवलं. काँग्रेसनं मोदी सरकारच्या या योजनेवर टीका करत 'भारत जोडो' यात्रेवरुन लक्ष विचलीत करण्यासाठीचा इव्हेंट असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रोजेक्ट चित्तासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला नाही याबाबत खंत व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी कधीच प्रशासन ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारत नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. 

जयराम रमेश यांनी यावेळी पंतप्रधान मोदींना काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी चित्ता भारतात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करुन दिली. यावेळी त्यांनी केपटाउनमध्ये चित्त्यासोबत टिपलेला एक फोटो देखील ट्विट केला आहे. "पंतप्रधान मोदी क्वचितच प्रशासन एक निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याचं स्वीकारतात. चित्ता प्रोजेक्टसाठी २४-०४-२०१० रोजी केपटाऊनमधील माझ्या दौऱ्याचा साधा उल्लेखही न करणं हे याचं ताजं उदाहरण आहे. आज पंतप्रधान मोदींनी विनाकारण तमाशा केला. राष्ट्रीय प्रश्न आणि राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेपासून लक्ष विचलीत करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत", असं जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

२००९-११ साली जेव्हा पहिल्यांदा वाघांना पन्ना आणि सरिस्का येथे स्थलांतरित करण्यात आलं होतं. तेव्हा अनेकांनी शंका उपस्थित केली होती. शंका उपस्थित करणारे सर्व चुकीचे ठरले होते. चित्ता प्रोजेक्टच्या बाबतीत देखील तशीच भविष्यवाणी केली जात आहे. यात सहभागी झालेले प्रोफेशनल्स खूप निपूण आहेत. या प्रोजेक्टसाठी माझ्या शुभेच्छा आहेत, असंही जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. 

या संपूर्ण घटनेवर काँग्रेस नेते पवन खेरा यांनीही टीका केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवर जयराम रमेश यांचे ट्विट रिट्विट करत त्यांनी आपला वाघ यावेळी देशाला जोडण्यासाठी बाहेर पडला आहे, त्यामुळे देश तोडणारे परदेशातून चित्ते आणत आहेत, असं म्हटलं आहे. 

७० वर्षांनंतर भारतात परतले चित्ते
पंतप्रधान मोदींनी शनिवारी मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्क (KNP) येथे नामिबियातून आणलेल्या चित्त्यांना विशेष बंदोबस्तात सोडले. यावेळी मोदींनी आपल्या प्रोफेशनल कॅमेऱ्यानं चित्त्यांची काही फोटोही टिपले. मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमधील या चित्त्यांवर भारतातील नामशेष होणाऱ्या प्रजातींची संख्या पुन्हा वाढवण्याची जबाबदारी असेल. हे चित्ते नोव्हेंबर 2021 मध्येच भारतात पोहोचणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे प्रक्रिया मंदावली. सुरुवातीला 8 चित्ते कुनो येथे पोहोचले आहेत. येत्या पाच वर्षात चित्यांची संख्या 50 पर्यंत वाढवण्याची तयारी आहे, म्हणजेच या प्रक्रियेतून आणखी बरेच चित्ते येण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: congress takes jibe on pm narendra modi cheetah project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.