तीन राज्यांत काँग्रेसची अन्य पक्षांशी आघाडी?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 04:21 AM2018-07-15T04:21:53+5:302018-07-15T04:22:07+5:30
विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आॅगस्टपासून प्रचार सुरू करणार आहेत.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : विधानसभा निवडणुका होत असलेल्या सर्व राज्यांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आॅगस्टपासून प्रचार सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांच्यासह राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
या राज्यांतील परिस्थितीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याच्या सूचना राहुल यांनी तिन्ही प्रदेशाध्यक्षांना दिल्या आहेत. बैठकीत कमलनाथ, पी. एल. पुनिया आणि दीपक बाबरिया यांनी विस्तृत अहवाल राहुल गांधी यांना दिला. तिथे भाजपाशी मुकाबला करण्यासाठी काँग्रेस कशा प्रकारे करू शकेल, याची माहितीही दिली.
निवडणुकांत अन्य पक्षांशी समझोता करण्याबाबत राहुल गांधी यांनी या नेत्यांकडून माहिती मागितली आहे. मध्य प्रदेशचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी स्पष्ट केले की, बसपा व अन्य समविचारी पक्षांशी चर्चा सुुरू असून, लवकरच निर्णय होईल. त्या राज्यात बसपा व गोंडवाना पार्टीशी आघाडी करण्याची तयारी काँग्रेस करीत आहे.
राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी राज्यात काँग्रेस स्वबळावर लढण्यास तयार असल्याचा विश्वास व्यक्त केला. छत्तीसगडमध्ये अद्याप संभ्रमाची स्थिती आहे. आघाडीबाबत काँग्रेस काय भूमिका घेईल ते स्पष्ट नाही. तेथील स्थितीविषयी १५ दिवसांनंतर या नेत्यांकडून अहवाल आल्यानंतर राहुल गांधी आघाडीबाबत अंतिम निर्णय घेतील, असे सांगण्यात येत आहे.
>बसपाशी चर्चा सुरू?
मध्य प्रदेशात भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचा मुकाबला मजबुतीने मुकाबला करण्यासाठी तिथे काँग्रेस अन्य पक्षांशी आघाडी वा समझोता करून मैदानात उतरेल, हे जवळपास नक्की आहे. प्रदेशाध्यक्ष कमलनाथ हेही आघाडीसाठी अनुकूल आहेत आणि ते बसपाच्या प्रमुख मायावती यांच्या संपर्कात आहेत.