कर्नाटकातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास; जाहीरनाम्यात केल्या 'या' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 06:13 PM2023-03-20T18:13:08+5:302023-03-20T18:14:05+5:30

भाजप सरकार सर्वात भ्रष्ट, ..त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही

Congress victory in the upcoming elections in Karnataka is certain, Rahul Gandhi expressed confidence; announcements made in the manifesto | कर्नाटकातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास; जाहीरनाम्यात केल्या 'या' घोषणा

कर्नाटकातील आगामी निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित, राहुल गांधींनी व्यक्त केला विश्वास; जाहीरनाम्यात केल्या 'या' घोषणा

googlenewsNext

प्रकाश बेळगोजी

बेळगाव : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस निश्चित विजयी होईल असा विश्वास व्यक्त करण्याबरोबरच बेरोजगार युवक-युवतींसाठी दोन वर्षापर्यंतच्या मासिक वेतनासह 5 वर्षात नोकऱ्या या घोषणेसह गृहलक्ष्मी, गृहज्योती आणि अन्नभाग्य या योजनांचा समावेश असलेल्या काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्याची काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी आज सोमवारी बेळगावातील जाहीर सभेत घोषणा केली.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा दुपारी शहरातील सीपीएड कॉलेज मैदानावर पार पडली. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार डॉ. अंजली निंबाळकर तसेच राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. 

आपल्या भाषणात राहुल गांधी यांनी सर्वप्रथम काही महिन्यापूर्वी कर्नाटकातून निघालेल्या भारत जोडो यात्रेला अबाल वृद्धांनी पाठिंबा देऊन ती यशस्वी केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या यात्रेने संपूर्ण देशाला एक संदेश दिला की हा देश काही निवडक लोकांचा नसून सर्वांचा आहे. शेतकरी, गरीब लोक आणि युवकांचा हा देश आहे. आमच्या भारत जोडो यात्रेमध्ये कोणताही रथ नव्हता तर बंधुत्व होतं. उच्चनीच असा भेदभाव न करता सर्वांनी एकाच पातळीवर चालत जाऊन बंधूभावाचा संदेश दिला. कर्नाटकच नव्हे तर देशातील सर्वच राज्यातील जनतेला भारत जोडो यात्रेत सामील व्हावयाचे होते. आज देशवासीयांना एकमेकांबद्दल तिरस्कार नको तर प्रेम हवं आहे. त्यासाठीच सध्याच्या तिरस्काराच्या बाजारात आम्ही या भारत जोडो यात्रेद्वारे प्रेमाची दुकाने खुली केली आहेत.

भाजप सरकार सर्वात भ्रष्ट, ..त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी दिले नाही

कर्नाटकात येथील लाखो युवकांकडून मला संदेश मिळाले आहेत. कोणतीही पदवी असू दे कर्नाटक सरकार आम्हाला नोकऱ्या देत नाही अशी त्यांची तक्रार आहे. दुसरा एक संदेश फक्त युवकांनीच नाही तर समस्त जनतेने मला दिला आहे. कर्नाटकातील सध्याचे भाजप सरकार हे देशातील सर्वात भ्रष्ट 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकातील भाजप सरकार हे 40 टक्के कमिशनचे सरकार आहे असे आमचे म्हणणे नाही तर येथील कंत्राटदार संघटना आणि शाळा व्यवस्थापनाने तशी माहिती पत्राद्वारे पंतप्रधानांना दिली आहे. त्या पत्राचे उत्तर पंतप्रधानांनी अजूनही दिलेले नाही. 

भ्रष्टाचाराचा खरा फायदा निवडक दोन-तीन लोकांना 

म्हैसूर सॅंडल सोप कंपनीमध्ये एका मंत्र्याच्या मुलाने केलेला 8 कोटी रुपयांचा घोटाळा, पीएसआय परीक्षा घोटाळा, सहाय्यक प्राध्यापक भरती घोटाळा असे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असंख्य प्रकरण कर्नाटकात घडत आहेत. त्यामुळे देशातील सर्वात भ्रष्ट सरकार कर्नाटक सरकार आहे हे मी नाही तर जनतेचे म्हणणे आहे. भ्रष्टाचाराचा खरा फायदा निवडक दोन-तीन लोकांना होत असतो. आज देशातील सर्व उद्योग, विमानतळ वगैरे अदानींच्या ताब्यात दिले जात आहेत. तेच इथे होत आहे. जे भाजपचे मित्र आहेत त्यांनाच या भ्रष्टाचाराद्वारे फायदा करून दिला जात आहे. 

काँग्रेसला परिस्थितीची जाणीव 

कर्नाटकातील रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या युवक युवतींच्या परिस्थितीची जाणीव काँग्रेसला आहे. त्यामुळे जर कर्नाटकात काँग्रेस सत्तेवर आल्यास पदवीधर युवक युवतींना दरमहा 3000 रुपये मासिक वेतन दोन वर्षापर्यंत दिले जाईल. त्याचप्रमाणे पदविका (डिप्लोमा) धारकांना दोन वर्षापर्यंत दरमहा 1500 रुपये वेतन दिले जाईल. याखेरीज बेरोजगार असलेल्या राज्यातील 10 लाख युवकांना सत्तेच्या पाच वर्षाच्या कालावधीत नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी प्रथम सध्या रिक्त ठेवण्यात आलेल्या सरकारी जागा भरून काढल्या जातील. 

गृहलक्ष्मी, गृह ज्योती आणि अन्नभाग्य या महत्त्वाकांक्षी योजना अंमलात आणल्या जातील. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक गृहिणीला दरमहा 2000 रुपये आर्थिक सहाय्य मिळेल. गृह ज्योति योजनेअंतर्गत प्रत्येक घराला 2000 युनिट वीज मोफत दिली जाईल, तर अन्नभाग्य योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील लोकांना (बीपीएल कार्डधारक) दरमहा दहा किलो तांदूळ मोफत दिला जाईल. याव्यतिरिक्त अनुसूचित जाती जमातीच्या राखीवतेमध्ये वाढ केली जाईल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असणार आहे. त्यासाठी आगामी निवडणूक आम्ही बहुमताने जिंकू. कर्नाटकातील जनता 40 टक्के कमिशनचे सरकार हटवू इच्छिते. त्याला सर्वसामान्य गरीब लोकांसाठीचे सरकार हवे आहे असे सांगून केव्हाही आपल्याला बोलवावे, आपण निवडणुकीच्या प्रचारासाठी कर्नाटकात कोठेही येण्यास तयार आहोत, असेही राहुल गांधी यांनी म्हणाले. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदींची यावेळी भाषणे झाली. या सर्वांनीच भाजपवर टीका करून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बहुमताने राज्यात सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त केला. आजच्या जाहीर सभेस नागरिकांसह जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Congress victory in the upcoming elections in Karnataka is certain, Rahul Gandhi expressed confidence; announcements made in the manifesto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.