काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 05:45 AM2019-03-26T05:45:58+5:302019-03-26T05:50:01+5:30

काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली.

Congress will give 72 percent of the poor every year; The last battle for eradicating poverty in the country | काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

काँग्रेस देणार गरिबांना वर्षाला ७२ हजार; देशातील दारिद्र्य निर्मूलनासाठी अखेरची लढाई

Next

नवी दिल्ली : काँग्रेस सत्तेवर आल्यास देशातील सर्वात गरीब पाच कोटी कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये देणारी ‘न्यूनतम आय योजना’ (न्याय योजना) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी जाहीर केली. याआधी काँग्रेसने ‘मनरेगा’ योजनेद्वारे१४ कोटी लोकांना दारिद्र्याच्या शापातून मुक्त केले आहे. आता ही ‘न्याय’ योजना राबवून पाच कोटी गरीब कुटुंबांमधील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढून दारिद्र्य निर्मूलनाची लढाई निर्णायकपणे जिंकू, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीनंतर गांधी यांनी पत्रकार परिषदेत योजनेचा तपशील जाहीर केला.
राहुल म्हणाले की, कोणालाही काम न करता घरी बसून पैसे देण्याची ही योजना नाही. आताही प् ा्रत्येक जण काम करतच आहे यापुढेही तो करत राहील. पण ज्यांचे उत्पन्न खूपच कमी आहे ते कितीही प्रयत्न केले तरी गरिबीतच खितपत राहतात. सरकार त्यांना एका ठराविक उत्त्पन्नाच्या मर्यादेपर्यंत आणून दारिद्र्याच्या नष्टचक्रातून कायमचे बाहेर पडण्यास मदत करेल. भविष्यात जेव्हा किमान १२ हजार रुपये मासिक उत्पन्न नसेलेले एकही कुटुंब देशात शिल्लक राहणार नाही, तेव्हा या योजनेची गरजच राहणार नाही व ती बंद होईल.
ही योजना टप्प्याटप्याने राबविली जाईल. आधी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबवून सुरुवात केली जाईल व नंतर ती देशभर राबविली जाईल, असेही सांगून ते म्हणाले की, काँग्रेसला गरीब नव्हे तर गरीबी नष्ट करायची आहे. ‘मनरेगा’ हा ‘गरीबी हटाव’चा पहिला टप्पा होता. आता ‘न्याय’हा दुसरा व निर्णायक टप्पा असेल.
ही योजना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आहे का? यासाठी पैसा कुठून आणणार? या प्रश्नांना उत्तर देताना गांधी म्हणाले की, सखोल विचार करून आम्ही ही योजना तयार केली आहे. त्यासाठी जगातील उत्तमोत्तम अर्थतज्ज्ञांचा विचार व सल्ला घेण्यात आला आहे. देशाची सध्याची वित्तीय क्षमता पाहता या योजनेसाठी निधी उपलब्ध होणे ही अशक्य कोटीतील बाब नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. योजनेचा तपशील करण्याचे काम सुरू आहे. देशात चांगल्या कामांसाठी मुबलक पैसा आहे
कोणत्याही देशात कधीही राबविली न गेलेली अशी ही योजना आहे. ती सादर करण्याचा आजचा दिवस काँग्रेसच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे, असेही राहुल म्हणाले. आम्ही मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ विधानसभांमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली व सत्तेवर येताच ती लागूही केली. त्याचप्रमाणे गरिबांना ‘न्याय’ देण्याचे हे वचनही काँग्रेस पूर्ण करेल, असे ते म्हणाले.
भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी श्रीमंतांचा व गरिबांचा असे दोन भारत तयार करीत आहेत. शेतकऱ्यांना रोज तीन रुपये देण्याची थट्टा करूनही ते स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. स्वत:च्या खासगी विमानांमधून फिरणाऱ्या उद्योगपतींसाठी त्यांच्याकडे पैसा आहे. पण काँग्रेस हाच पैसा गरिबांसाठी वापरण्यास कटिबद्ध आहे.

योजनेचा हा आहे तपशील
राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्वात गरीब २० टक्के कुटुंबांना दरमहा किमान १२ हजार रुपये उत्पन्न असणे हे या योजनेचे मुख्य सूत्र असेल. उदाहरण देताना ते म्हणाले की, एखाद्या कुटुंबाचे मासिक उत्पन्न सहा हजार रुपये असेल तर त्या कुटुंबाला दरमहा सहा हजार रुपये देऊन सरकार किमान १२ हजार रुपयांची पूर्तता करेल. लाभार्थी कुटुंबाचे मासिक उत्पन्न १२ हजारांहून जेवढे कमी असेल, त्या फरकाची पूर्तता सरकार करेल. अशा प्रकारे या पाच कोटी कुटुंबाना सरकारकडून वर्षाला कमाल ७२ हजार रुपये दिले जातील. उत्पन्नपूर्तीची ही रक्कम लाभार्थी कुटुंबाच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल.

Web Title: Congress will give 72 percent of the poor every year; The last battle for eradicating poverty in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.