सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 23:10 IST2025-04-15T23:01:53+5:302025-04-15T23:10:18+5:30

ईडीच्या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभर निषेध करण्याची घोषणा केली आहे.

Congress will hold a big protest outside ED offices across the country tomorrow | सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेस भडकली; देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर उद्या करणार आंदोलन

National Herald Case: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. दहा दिवसांनी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.  त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यासंदर्भात काँग्रेस देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर आंदोलन करणार आहे. बुधवारी देशातील विविध ईडीच्या कार्यालयांबाहेर काँग्रेस कार्यकर्ते या कारवाईविरोधात निषेध नोंदवणार आहे. काँग्रेसने या संदर्भात सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांना एक परिपत्रक जारी केले आहे.

नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरून काँग्रेसने देशव्यापी निषेध जाहीर केला आहे. पक्षाने या संदर्भात सर्व प्रदेश काँग्रेस समित्यांना परिपत्रक जारी करत निषेध करण्यास सांगितले आहे. ईडीने आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधींसह इतर नेत्यांचे नाव दाखल केल्याने काँग्रेसकडून निषेध करण्यात येत आहे. काँग्रेस नेत्यांनी याला राजकीयदृष्ट्या प्रेरित कारवाई म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी या कारवाईविरोधात बुधवारी देशभरात आंदोलनाची घोषणा केली आहे.

"पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सरकारच्या सूडबुद्धीला मर्यादा नाही. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि बनावट नॅशनल हेराल्ड प्रकरणाचा वापर केला जात आहे. हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची निराशा दर्शवते. ते लोकांच्या चिंता सोडवण्यात अपयशी ठरले आहेत आणि सतत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत," असे काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले.

"असं वाटतं की, ते (भाजप) विसरले आहेत की या कुटुंबाने देशासाठी आपले रक्त सांडले आहे. या युक्त्या आणि त्यांच्या यंत्रणांचा वापर आपल्याला परावृत्त करणार नाही तर या विनाशकारी राजवटीविरुद्धचा आपला निर्धार अधिकच बळकट करेल. आम्ही बुधवारी देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने करू आणि या प्रकारच्या सूडबुद्धीच्या आणि धमकीच्या राजकारणाविरुद्ध आमचा तीव्र निषेध नोंदवू," असेही केसी वेणुगोपाल यांनी म्हटले.
 

Web Title: Congress will hold a big protest outside ED offices across the country tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.