काँग्रेसचं ठरलं! मोदी सरकारला असं घेरणार, ३१ मार्चपासून 'महागाईमुक्त भारत अभियान'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 04:59 PM2022-03-26T16:59:23+5:302022-03-26T17:00:18+5:30
देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे.
देशातील वाढती महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतीच्या मुद्द्यावरून काँग्रेस ३१ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान 'महागाई मुक्त भारत अभियान' सुरू करणार आहे. या मोहिमेची सुरुवात तीन टप्प्यात धरणे आंदोलनानं केली जाणार आहे. काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने लोकांना महत्व न देता आपली तिजोरी भरण्याचा उद्योग सुरू केला आहे.
महागाई आणि इंधनाच्या वाढत्या किमतींविरोधातील आंदोलनात राहुल गांधी आणि प्रियंका गांधीही सहभागी होणार असल्याचे सुरजेवाला यांनी सांगितले. सुरजेवाला म्हणाले की, इंधनाच्या सततच्या लूटमुळे सर्वसामान्यांच्या खिसे रिकामे होत आहेत. पण सरकारला त्याची पर्वा नाही. पाच दिवसांत आज चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाल्यावरून भाजप सरकारवर काँग्रेसनं हल्लाबोल केला.
'राजा करे महल की तैयारी, प्रजा गरीबी महागाई की मारी' असे म्हणत राहुल गांधींनीही इंधनाच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याचा बोजा तेल कंपन्या ग्राहकांवर टाकत असून, त्यामुळे गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा दरात वाढ करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर पहिल्यांदाच २२ मार्च रोजी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आणि तेव्हापासून सातत्यानं दर वाढत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी जारी केलेल्या किमतीच्या अधिसूचनेनुसार, राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर आता ९७.८१ रुपये प्रति लिटरवरून ९८.६१ रुपये आणि डिझेलचा दर ८९.०६ रुपयांवरून ८९.८७ रुपये प्रति लिटर झाला आहे. . साडेचार महिने दर स्थिर राहिल्यानंतर २२ मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून दरात प्रतिलिटर ८०-८० पैशांनी तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. एकूण चार वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर एकूण ३.२० रुपयांनी वाढ झाली आहे.