काँग्रेसचे गोवा, गुजरातेत लवकरच नवे प्रदेशाध्यक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:04 AM2021-07-24T06:04:25+5:302021-07-24T06:05:21+5:30
भारतीय जनता पक्षाला लढत देण्याच्या अवस्थेत जेथे काँग्रेस आहे त्या राज्यांत वरिष्ठ नेते राहुल गांधी पक्षावर लक्ष केंद्रीत करीत आहेत.
व्यंकटेश केसरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाला लढत देण्याच्या अवस्थेत जेथे काँग्रेस आहे त्या राज्यांत वरिष्ठ नेते राहुल गांधी पक्षावर लक्ष केंद्रीत करीत आहेत. राज्य काँग्रेस समित्या बळकट करण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत. पंजाब आणि उत्तराखंडमध्ये प्रदेश काँग्रेसला नवे अध्यक्ष नुकतेच दिले गेल्यामुळे ते आता गोवा आणि गुजरात प्रदेश काँग्रेसचे सध्याचे अध्यक्षही लवकरच बदलतील अशी अपेक्षा आहे. या चारही राज्यांत पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
गोवा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आधीच राजीनामा दिला असून गुजरात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित चावडा यांचा राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची कामगिरी फारच खालावल्यानंतर चावडा यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवलेली आहे. राजस्थान विधानसभेची निवडणूक २०२३ मध्ये असली तरी अखिल भारतीय काँग्रेस समितीने माजी उप मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांच्या भूमिकेबद्दल अजून निर्णय घेतलेला नाही.