काँग्रेस 'भारत जोडो यात्रे'चा दुसरा टप्पा सुरू करणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयार होतोय प्लॅन!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2023 09:06 PM2023-06-02T21:06:35+5:302023-06-02T21:07:19+5:30
'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या 'भारत जोडो यात्रे'चा पहिला टप्पा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पूर्ण केला आहे. नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर काँग्रेस या 'भारत जोडो यात्रे'च्या परिणामाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राहुल गांधींच्या 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवता यावा यासाठी निवडणुकीपूर्वी ही यात्रा संपवण्याची काँग्रेसची रणनीती आहे.
'भारत जोडो यात्रे'च्या पहिल्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नवी प्रतिमा देशासमोर उभी राहिली आहे, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. यामुळे 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत. 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्यात राहुल गांधी हे देशात पूर्वेकडून पश्चिमेकडे यात्रा करू शकतात. दुसऱ्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशातून 'भारत जोडो यात्रा' सुरू होण्याची शक्यता असून गुजरातमधील पोरबंदरला जाऊन संपेल, असे म्हटले जात आहे. याआधी पोरबंदरमधून 'भारत जोडो यात्रे'ची सुरुवात होणार असल्याची बातमी समोर आली होती.
दुसऱ्या टप्प्यातील 'भारत जोडो यात्रे'त जवपास 3100 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. पहिला टप्पा 3570 किलोमीटरचा होता. अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंड येथून प्रवास सुरू होऊ शकतो. दुसऱ्या टप्प्यातील प्रवासासाठी 140 ते 150 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. याचबरोबर, या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता हायब्रीड ट्रॅव्हल्सचा पर्यायही ठेवण्यात आला आहे. याशिवाय, 2024 च्या निवडणुकीपूर्वी 'भारत जोडो यात्रे'च्या दुसऱ्या टप्प्याचा वेग कायम ठेवण्याची काँग्रेसची रणनीती आहे, जेणेकरून या पाठिंब्याचे मतांमध्ये रूपांतर करता येईल. इंग्लंड आणि अमेरिका दौऱ्यानंतर काँग्रेसला राहुल गांधींची नव्याने ओळख करायची आहे.