मध्य प्रदेशात काँग्रेसला भगदाड पडणार; कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार? अशी आहे रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2024 02:02 PM2024-02-18T14:02:47+5:302024-02-18T14:05:17+5:30

कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसला मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत असून त्यांनी त्यादृष्टीने तयारीही केल्याची माहिती आहे.

Congress will suffer in Madhya Pradesh 22 MLAs with Kamal Nath | मध्य प्रदेशात काँग्रेसला भगदाड पडणार; कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार? अशी आहे रणनीती

मध्य प्रदेशात काँग्रेसला भगदाड पडणार; कमलनाथ यांच्यासोबत २२ आमदार? अशी आहे रणनीती

Kamal Nath BJP Entry ( Marathi News ) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे पुत्र आणि काँग्रेस खासदार नकुलनाथ यांच्यासमवेत भाजपचे कमळ हाती घेणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून कमलनाथ यांच्या भाजप प्रवेशाचे ठिकाण आणि वेळ ठरवण्यात येणार आहे. कमलनाथ यांच्यासारखा अनुभवी आणि राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळलेला नेता भाजपमध्ये जाणार असल्याने काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसणार आहे. ज्या कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने नुकतीच झालेली मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली होती, तेच कमलनाथ आता भाजपमध्ये प्रवेश का करत आहेत आणि यामागची त्यांची रणनीती कशी असणार आहे, याबाबतही आता चर्चांना उधाण आलं आहे. कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसला मोठं भगदाड पाडण्याच्या तयारीत असून त्यांनी त्यादृष्टीने तयारीही केल्याची माहिती आहे.

पक्षात येताना कमलनाथ यांनी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार घेऊन यावेत, अशी भाजपची अपेक्षा आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपला खरंतर सत्तेसाठी आमदारांची आवश्यकता नाही. मात्र आमदार फोडून काँग्रेसला खिळखिळी करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीट वाटपाचे अधिकार कमलनाथ यांच्याकडेच होते. त्यामुळे काँग्रेसचे जे काही आमदार निवडून आले आहेत, त्यातील बहुतांश आमदार कमलनाथ समर्थक आहेत. या आमदारांना फोडणं, कमलनाथ यांच्यासाठी फारसं कठीण नाही. काँग्रेसचे ६३ पैकी २२ आमदार कमलनाथ यांच्यासोबत जाण्यास उत्सुक असल्याचं समजते. २२ पेक्षा जास्त आमदार सोबत आल्यास त्यांना राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवायला सांगितलं जाऊ शकतं.  

सर्वांना तिकीट देण्याची अट

माझ्यासोबत काँग्रेसचे जे काही आमदार येतील, त्यांनी राजीनामा देऊन पोटनिवडणूक लागल्यानंतर त्या सर्वांना तिकीट दिलं जावं, अशी अट कमलनाथ यांच्याकडून ठेवण्यात आल्याची माहिती आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले होते तेव्हाही असा पॅटर्न राबवला गेला होता. 

दरम्यान, मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणूक सपाटून मार खालल्यानंतर काँग्रेसने कमलनाथ यांच्याकडे दुर्लक्ष करत जीतू पटवारी यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. तसंच राज्यसभा निवडणुकीतही कमलनाथ यांना विश्वासात घेण्यात आलं नाही. त्यामुळे आता काँग्रेस सोडताना पक्षाच्या आमदारांसह स्थानिक पातळीवरील विविध पदाधिकारी आणि नेत्यांनाही भाजपमध्ये नेत काँग्रेसला हादरा देण्याचा प्रयत्न कमलनाथ यांच्याकडून केला जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Congress will suffer in Madhya Pradesh 22 MLAs with Kamal Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.