..तर पंतप्रधानपदासाठी काँग्रेस देणार प्रादेशिक नेतृत्वास पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 02:00 PM2018-07-25T14:00:47+5:302018-07-25T14:01:40+5:30
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. एकीकडे पुढील निवडणुका राहुला गांधींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानपदासाठी...
नवी दिल्ली - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. त्यासाठी मतांची आणि जागांची जुळवाजुळव करण्यासाठी काँग्रेसने प्रादेशिक पक्षांच्या आघाडीची मोट बांधण्यासाठीही काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एकीकडे पुढील निवडणुका राहुला गांधींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारिणीत घेण्यात आला आहे. मात्र पंतप्रधानपदासाठी राहुल गांधींच्या नावास विरोध झाल्यास काँग्रेसकडून प्रादेशिक पक्षांच्या नेत्यास पाठिंबा देण्याची चाचपणी करण्यात येत आहे. दरम्यान भाजपाने काँग्रेसच्या या रणनीतीवर टिप्पणी करताना या मान्सूनमध्ये पंतप्रधानांचा पाऊस पडत असल्याचा टोला लगावला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भाजपाविरोधी आघाडीचे शिल्पकार म्हणून समोर येतील, अशी काँग्रेसमधील नेत्यांना अपेक्षा आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीने पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावावर विश्वास दर्शवला असला तरी महाआघाडीसाठी विरोधी पक्षांशी सुरू असलेली चर्चा पुढे नेण्यासाठी पक्षाने मोकळेपणाने विचार केला पाहिजे असे, पक्ष नेतृत्वाचे म्हणणे आहे. केंद्रातील भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचणे हीच काँग्रेसची प्राथमिकता आहे. त्यामुळे नेतृत्वाच्या मुद्यावरून विरोधी पक्षांसोबत मतभेद निर्माण करण्याची पक्षाची इच्छा नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसच्या या भूमिकेमुळे तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी, बीएसपीच्या मायावती, तसेच समाजवादी पार्टी, आरजेडी असा पक्षांच्या नेतृत्वास दिलासा मिळाला आहे. मात्र प्रादेशिक पक्षांसोबत फरफटत जाण्याचीही काँग्रेसची इच्छा नाही, असेही काँग्रेसमधील सूत्रांनी स्पष्ट केले आहे.