कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 07:47 PM2023-06-13T19:47:43+5:302023-06-13T19:48:38+5:30

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे.

Congress will win in Madhya Pradesh after Karnataka? That the BJP will retain power, the data came out from the opinion poll | कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी

googlenewsNext

गेल्या महिन्यात झालेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसनेभाजपाला चारीमुंड्या चीत करत दणदणीत विजय मिळवला होता. आता यावर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशसह इतर राज्यांत होणाऱ्या निवडणुकीतही भाजपाला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी काँग्रेसनं कंबर कसली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. त्यात भाजपा बाजी मारेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

झी न्यूज या वृत्तवाहिनीसाठी हा ओपिनियन पोल MATRIZE ने केला आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीनुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपाला ४५ तर काँग्रेसला ३९ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये १६ टक्के मते जातील. तर या मतांचं जागांमध्ये परिवर्तन केल्यास भाजपाला ११९ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसला ९४ ते १०४ जागा मिळतील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे. तर इतरांच्या खात्यामध्ये ४ ते ९ जागा जातील, असे या ओपिनियन पोलमध्ये म्हटले आहे.

या ओपिनियन पोलमध्ये मध्य प्रदेशची पाच विभागात विभागणी करून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्या चंबळ विभागात विधानसभेच्या ३४ जागा आहेत. त्यापैकी भाजपाला १५ ते २० आणि काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील. तर इतरांच्या खात्यात १ ते २ जागा जातील. 

महाकौशल विभागामध्ये ४९ जागा असून, त्यातील २३ ते २८ जागा भाजपाला मिळतील तर २० ते २५ जागा काँग्रेस जिंकेल, असा अंदाज या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे. तर इतरांना या विभागात ० ते १ जागा मिळेल, असे म्हटले आहे. 

माळवा विभागामध्ये २८ जागा आहेत. त्यात भाजपा ११ ते १५ जागा जिंकेल. तर काँग्रेसला १२ ते १७ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माळवा उत्तर या विभागात ६३ जागा आहेत. येथे भाजपाला ३२ ते ३७  आणि काँग्रेसला २४ ते २९ जागा मिळतील, तर इतरांच्या खात्यामध्ये २ जागा जातील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विंध्य विभागात ५६ जागा आहेत. येथे भाजपाला ३१ ते ३६ तर काँग्रेसला १९ ते २४ जागा मिळतील. इतरांच्या खात्यामध्ये १ ते ३ जागा जातील, अशा अंदाज या सर्व्हेमधून वर्तवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री म्हणून सर्व्हेमध्ये मध्य प्रदेशमधील ३६ टक्के लोकांनी शिवराज सिंह चौहान यांच्या नावाला पसंती दिली आहे. तर २३ टक्के लोकांनी कमलनाथ यांच्या नावाला पसंती दिली आहे. दिग्विजय सिंह यांना ६ टक्के लोकांनी तर ज्योतिरादित्य शिंदे यांना १० टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली आहे. जितू पटवारी यांना ९ टक्के तर नरोत्तम मिश्रा यांना ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.  

Web Title: Congress will win in Madhya Pradesh after Karnataka? That the BJP will retain power, the data came out from the opinion poll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.