आता काँग्रेसच जिंकणार, राहुल गांधींनी फुंकले रणशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 05:54 AM2018-04-30T05:54:31+5:302018-04-30T05:54:31+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेचा आणि देशाचा विश्वासघात केला आहे. मोदी केवळ खोटे बोलत आहेत आणि त्यांच्या बोलण्यात दम राहिलेला नाही, अशा जोरदार शब्दांमध्ये टीका करत, राहुल गांधी यांनी येत्या सर्व निवडणुकांमध्ये काँग्रेसचाच विजय होईल, असा विश्वास व्यक्त केला. रामलीला मैदानावर झालेल्या काँग्रेसच्या जन आक्रोश सभेत देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी पुढील लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे.
हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या खोट्या आश्वासनांची लक्तरे काढली. चार वर्षांपूर्वी मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैैकी एकही आश्वासन त्यांना पूर्ण करता आलेले नाही. मोदींच्या काळात शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे आणि दुसरीकडे उद्योजकांचे कर्ज माफ केले जात आहे. तरुण अजूनही रोजगाराच्या शोधातच आहेत. ते म्हणाले की, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह लोकसभा निवडणुकांमध्येही यश मिळवायचे आहे, त्या दृष्टीने कंबर कसून कामाला लागले पाहिजे.
यावर मोदी गप्प का? राहुल यांची टीका
भ्रष्टाचार : मोदी भ्रष्टाचार संपविण्याच्या वल्गना करतात. भ्रष्टाचाराविरोधात लढा देण्याची भाषा मोदी कर्नाटकच्या सभांमध्ये करतात तेव्हा त्यांच्यासोबत येदियुरप्पा व्यासपीठावर असतात. येदियुरप्पा तुरुंगाची हवा खाऊन आले आहेत. पीयूष गोयल ४७ कोटी रुपये कमावतात, पण या प्रकरणांबद्दल मोदी एका शब्दाने काही बोलत नाहीत. नीरव मोदी हजारो कोटींचा भ्रष्टाचार करून देशाबाहेर पळाला. बँकांचा पैसा लुटला जातोय, तरीही मोदी गप्प बसतात.
बेरोजगारी : दोन कोटी युवकांना रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले, या व अशा गोष्टींबद्दल मोदी मौन बाळगून आहेत.
दलित-महिलांवर अत्याचार - देशात दलित व महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. भाजपाच्या आमदारानेच बलात्कार केल्याची घटना घडली. यावरून परदेशात आपल्या पंतप्रधानांना निषेधाचा सामना करावा लागतो, हे लाजिरवाणे आहे. मोदी म्हणतात, ‘बेटी बचाओ’, पण जेव्हा अत्याचार होतात, तेव्हा ते गप्प बसतात, असा टोलाही राहुल यांनी लगावला.
सरकारकडून विरोधकांची गळचेपी - सोनिया गांधी
सरकारी यंत्रणांचा वापर करून विरोधकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न मोदी सरकारकडून होत आहेत, अशी टीका काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी जन आक्रोश सभेमध्ये बोलताना केली.
लोकशाही धोक्यात! - मनमोहन सिंग
गेल्या चार वर्षांमध्ये देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असा हल्ला डॉ. मनमोहन सिंग यांनी केला.