"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा", आप आमदाराचा स्फोटक दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 12:51 PM2024-09-08T12:51:19+5:302024-09-08T12:53:56+5:30
Congress AAP Alliance Update : काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध करत आम आदमी पक्षाचे नेते, आमदार सोमनाथ भारती यांनी खळबळजनक दावे केले आहेत. केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचाच होता, असा गंभीर आरोप भारती यांनी केला.
Somnath Bharti News : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी होणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. अनेक बैठका दोन्ही पक्षांमध्ये झाल्या आहेत. पण, एकमत झालेले नाही. या आघाडीबद्दल दोन्ही पक्षातील काही नेत्यांचा नकार आहे. त्यातच आता आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नाव घेत गंभीर आरोप केला आहे.
सोमनाथ भारती यांनी काँग्रेससोबतची आघाडी करणे विसंगत आहे, असे म्हटले आहे. त्याचबरोबर मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
काँग्रेस-भाजपची आतून मिलीभगत -भारती
"आम आदमी पार्टीला हरवण्यासाठी काँग्रेस आणि भाजप लपून छपून एकत्र काम करत आहेत. त्यांची मिलीभगत आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जून खरगे यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी आपच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही", असे सोमनाथ भारती म्हणाले.
"केजरीवालांना तुरुंगात टाकण्याचा कट काँग्रेस नेत्याचा"
सोमनाथ भारती यांनी अजय माकन यांच्यावर गंभीर आरोप केला. "काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपची मदत केली आणि ज्या कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि आपचे नेते तुरुंगात गेले, तो कट काँग्रेस नेते अजय माकन यांचा आहे", असे आमदार सोमनाथ भारती म्हणाले.
"आम आदमी पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवावी"
सोमनाथ भारती यांनी काँग्रेससोबत आघाडी करण्याला विरोध केला आहे. हरियाणा आणि दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी सोमनाथ भारती यांनी आपच्या नेतृत्वाकडे केली आहे.
"आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिन्ही उमेदवारांसाठी रोड शो केला. आपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि कॅबिनेट मंत्र्यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार केला. पण, आप उमेदवारांना विशेषतः दिल्लीत काँग्रेस आणि स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला नाही", असा आरोप आमदार भारती यांनी केला आहे.