२४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 05:48 AM2020-02-05T05:48:02+5:302020-02-05T06:19:37+5:30

सर्वोत्कृष्ट शिक्षण देणार; जगातील सर्वोकृ ष्ट शहर बनविण्याचा निर्धार

Continue the market for 24 hours; AAP's assurance in the declaration | २४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन

२४ तास बाजारपेठा सुरू ठेवू; जाहीरनाम्यात ‘आप’चे आश्वासन

Next

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात दिल्लीत सर्वोत्कृष्ट शिक्षण, स्वच्छ पाणी, २४ तास वीज पुरवठा करण्याची आश्वासने आणि प्रायोगिक तत्त्वावर बाजारपेठा २४ तास सुरू ठेवण्याचा शब्द दिला आहे.

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी २८ योजनांचे गॅरंटी कार्ड नावाने तो जाहीर केला. प्रत्येक घराला रेशन, १० लाख ज्येष्ठांना मोफत तीर्थयात्रा, सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू कामावर असताना झाल्यास कुटुंबाला एक कोटींची भरपाई, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा या घोषणाही त्यात आहेत. युवकांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास प्रोत्साहन व हॅपीनेस क्लास अंतर्गत देशभक्तीचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. जगातील सर्वात मोठे मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर दिला जाईल, असेही सिसोदिया म्हणाले.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी तीन दिवस शिल्लक असताना आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला आव्हान दिले आहे की, त्यांनी बुधवारपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. या उमेदवारासोबत आपण जाहीरपणे चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केजरीवाल म्हणाले की, जर भाजपने असे केले नाही तर आपले पुढचे पाऊल काय असेल याबाबत आपण मीडियाशी संवाद साधू. दिल्लीकरांची इच्छा आहे की, भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा. केजरीवाल म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर न करता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकांकडून कोºया चेकची मागणी करीत आहेत. ते लोकांना सांगत आहेत की, आपण नंतर चेकवर मुख्यमंत्रीपदाचे नाव लिहू. लोकशाहीत मुख्यमंत्री लोकांकडून निवडला जातो, अमित शहांकडून नाही, असेही केजरीवाल म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राष्ट्रवादावर भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात राष्ट्रवादाच्या मुद्यावर भर दिला असून राष्ट्रविरोधी राजकारण करणाऱ्यांची ८ रोजी सुटी करा असे आवाहन त्यांनी केले. दिल्लीतील दुसºया सभेत त्यांनी ना शाहीनबागचा उल्लेख केला ना तुकडे तुकडे गँगचा.एअर स्ट्राइक, सीएए आणि कलम ३७० या मुद्यांवर त्यांचा भर होता. दिल्लीतील जनतेला मीठाचा हवाला देत ते म्हणाले की, मी दिल्लीचे मीठ खाल्ले आहे.
येथील विकास करुन दाखवेन. व्दारका येथील डीडीए ग्राउंडवर सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, हे लोक बाटला हाउसच्या अतिरेक्यांसाठी रडू शकतात. मात्र, ते दिल्लीचा विकास करु शकत नाहीत.

बेरोजगारी योगायोग की पंतप्रधानांचा प्रयोग -प्रियांका गांधी

देशभरात घटलेला रोजगार वाढती बेरोजगारी हा योगायोग आहे की पंतप्रधानांचा प्रयोग? असा प्रश्न करताना काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली. संगम विहार येथे निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद या मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार आहेत.

प्रियंका गांधी यांनी पहिल्यांदाच या निवडणुकीच्या काळात प्रचार सभेत जाहीर भाषण केले. काँग्रेससाठी प्रचार सत्तेत येण्याआधी नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, देशात बेरोजगारांमध्येच मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात साडेतीन कोटी युवकांचा रोजगार गेला. हा योगायोग आहे की, मोदींचा प्रयोग आहे, असा सवाल त्यांनी केला. वाढती बेरोजगारी हा केवळ योगायोग नसून यामागे भाजपचा हात असल्याचा आरोपही प्रियंका गांधी यांनी केला. भाजपच्या धोरणांना कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर त्याला देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न केला जातो, असेही त्या म्हणाल्या.

मोदी-केजरीवाल भांडणात विकास रखडला -राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या भांडणात दिल्लीचा विकास रखडला असल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. जंगपुरा या भागात जाहीर सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कार्यकाळात दिल्लीचा विकास झाला होता. गेल्या पाच वर्षांपासून मोदी व केजरीवाल मार्केटिंगचा फंडा वापरत आहेत. जंगपुरा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार तलविंदर सिंग मारवा यांच्याबद्दल त्यांनी प्रशंसोद्गार काढले. तरविंदर सिंग मारवा यांनी पाकमध्ये जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्यांना पाकच्या कारागृहात राहावे लागले होते. भाजपचे नेते देशात संरक्षणात हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात; काँग्रेसचे उमेदवार पाकमध्ये जाऊन हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देतात. ही हिंमत भाजपच्या नेत्यांमध्ये आहे काय? अशी विचारणा राहुल गांधी यांनी केली.

Web Title: Continue the market for 24 hours; AAP's assurance in the declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.