Controversial statement: काँग्रेसला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही, जोवर...; राहुल, सोनिया गांधींसंदर्भात भाजपच्या मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 08:55 PM2022-04-15T20:55:44+5:302022-04-15T20:57:19+5:30
उत्तराखंडचे कृषिमंत्री गणेश जोशी (Ganesh Joshi) यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) ...
उत्तराखंडचे कृषिमंत्री गणेश जोशी (Ganesh Joshi) यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांनी, राहुल गांधी यांना 'पप्पू', तर सोनिया गांधी यांना 'बबली' असे संबोधत, काँग्रेसला संपवण्यासाठी कुणाचीही गरज नाही, जोवर पप्पू आणि बबली काँग्रेसमध्ये राहतील तोवर काँग्रेस संपत राहणार, असे म्हटले आहे.
काँग्रेसच्या गटबाजीवर हल्ला -
मसुरी येथे एका कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री गणेश जोशी म्हणाले, काँग्रेसकडून उत्तराखंडमध्ये तब्बल एक महिन्यानंतर विरोधी पक्षनेता आणि प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून काँग्रेसमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून येत आहे. सातत्याने राजीनामे पडत आहेत. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या एका आमदाराने चक्क मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासाठी आपली जागा सोडण्याचीही घोषणा केली आहे. याच बरोबर, वेगळा पक्ष बनविण्याचीही चर्चा सुरू आहे.
लोकांचा भाजपवरील विश्वास वाढतोय -
जोशी म्हणाले, लोकांचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास सातत्याने वाढताना दिसत आहे. कारण भारतीय जनता पक्ष, जे बोलतो ते करून दाखवतो. याच बरोबर, जे लोक काँग्रेस सोडून भाजपत आले आहेत, भाजपने त्यांना सन्मान दिला आहे. त्यांना मंत्रिमंडळातही जागा दिली आहे, असेही ते म्हणाले.