काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाआधीच वाद, भाजपने घेरलं; नकाशाचा वाद काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:14 IST2024-12-26T13:11:57+5:302024-12-26T13:14:29+5:30
Congress cwc meeting: काँग्रेस कार्य समितीचे विशेष अधिवेशन बेळगावात होत असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वादाला तोंड फुटले आहे. काँग्रेसच्या बॅनर्सवरील भारताच्या नकाशावरून भाजपने घेरलं आहे.

काँग्रेसच्या बेळगाव अधिवेशनाआधीच वाद, भाजपने घेरलं; नकाशाचा वाद काय?
Congress cwc meeting today: सर्व निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या कार्यसमितीचे विशेष अधिवेशन बेळगावमध्ये होत आहे. दोन दिवस हे अधिवेशन होत असून, एक सभाही होणार आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने भारताच्या नकाशावरून घेरलं. कार्य समितीच्या अधिवेशनानिमित्ताने बॅनर्स लावले गेले. या बॅनरवर भारताचा चुकीचा नकाशा लावल्याने राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
बेळगावमध्ये होत असलेल्या अधिवेशनानिमित्ताने कार्यकर्त्यांकडून बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरवर जम्मू काश्मीर वगळण्यात आलेला भारताचा नकाशा या बॅनरवर छापलेला होता. जम्मू आणि काश्मीर भारताचा भाग नसल्याचा नकाशा लावल्याचा मुद्दा भाजपने उचलून धरत काँग्रेसवर टीकास्त्र डागलं.
भाजपची काँग्रेसवर टीका
या मुद्द्यावरून भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले.
"काँग्रेस पक्ष भारत जोडो म्हणतो, पण बेळगाव अधिवेशनात त्यांनी भारताचा जो नकाशा लावला, त्यात छेडछाड केली गेली आहे. या नकाशात जम्मू आणि काश्मिरला पाकिस्तानचा आणि अक्साई चीनला चीनचा भाग दाखवला आहे. हा नकाशा अधिवेशनात लावण्यातून हेच दिसतं की, काँग्रेसची मानसिकता नेहमी देशाचे तुकडे करण्याची राहिलेली आहे", अशी टीका पूनावाला यांनी केली आहे.
बेळगावमध्ये काँग्रेसच्या कार्यसमितीचे अधिवेशन का होत आहे?
फेब्रुवारी १९२४ मध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर महात्मा गांधी तुरुंगात बाहेर आले होते. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये एकजूट नसल्याने ते निराश होते. दोन्ही समुदायातील अंतर दूर करण्यासाठी त्यांनी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर असे २१ दिवस उपवास केला होता. काँग्रेसमधील गटबाजीही त्यांना संपवायची होती. त्यासाठी त्यांनी बेळगावमध्ये अधिवेशन घेऊन सभा घेतली होती.
१९२४ च्या याच अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त आता दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून, या अधिवेशनाला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसचे शीर्षस्थ नेते या अधिवेशनाला हजर राहणार आहेत.