राहुल गांधींच्या 'हिंदूं'वरील वक्तव्याने वाद; BJP खासदार बन्सुरी स्वराज यांनी बजावली नोटीस...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 02:40 PM2024-07-02T14:40:51+5:302024-07-02T14:42:09+5:30
भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी आणि भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांनी भर लोकसभेत राहुल गांधींना नोटीस बजावली.
Parliament Session 2024 : संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी काल(दि.1 जुलै) हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवत राहुल गांधींनी "जे स्वतःला हिंदू म्हणवतात, ते हिंसाचार पसरवतात," असे वक्तव्य केले होते. यामुळे भाजप खासदार बन्सुरी स्वराज (Bansuri Swaraj) यांनी आज राहुल यांना नोटीस बजावली आहे.
भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांची मुलगी आणि पहिल्यांदाच दिल्लीतून खासदार झालेल्या बन्सुरी स्वराज यांनी भर लोकसभेत राहुल गांधी यांच्या भाषणाबाबत नियम 115 अंतर्गत नोटीस बजावली. त्या म्हणाल्या, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आपल्या भाषणात अनेक चुकीची आणि दिशाभूल करणारी विधाने केली. यावेळी बन्सुरी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे राहुल गांधींवर कारवाईची मागणीही केली आहे. दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी चार वाजता राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावाला उत्तर देणार आहेत. यावेळी ते राहुल गांधींच्या वक्तव्याला नक्कीच प्रत्युत्तर देतील.
#WATCH | BJP MP Bansuri Swaraj moved a notice under Direction 115 in Lok Sabha over LoP Rahul Gandhi's speech.
— ANI (@ANI) July 2, 2024
She said, "LoP Rahul Gandhi made several inaccurate statements in his speech yesterday..." pic.twitter.com/2or5NWYE8I
काय म्हणाले होते राहुल गांधी ?
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान भगवान शंकराचे चित्र दाखवले आणि शंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख करत म्हणाले की, काँग्रेस सध्या अभय मुद्रेमध्ये आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर हिंसाचारात गुंतल्याची टीकाही केली. भगवान शंकराच्या फोटोसह राहुल गांधींनी कुराणचा उल्लेख केला, गुरु नानक आणि येशूंचा फोटोही दाखवला. ते म्हणाले की, कुराणात लिहिले आहे, घाबरू नका. येशू म्हणतात घाबरू नका आणि कुणालाही घाबरवू नका. सर्व धर्मग्रंथांमध्ये अहिंसेचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येकजण अहिंसेबद्दल, भीती घालवण्याबद्दल बोलले आहेत. आपला देश अहिंसेचा देश आहे. अहिंसा हे हिंदूंचे प्रतीक आहे, पण सध्या सत्तेत असलेले हिंदू नाहीत. स्वतःला हिंदू म्हणवून घेणारेच चोवीस तास हिंसाचार आणि द्वेषात गुंतले आहेत, अशी टीका राहुल यांनी केली.
राहुल गांधींच्या वक्तव्यावर पीएम मोदींचा पलटवार...
राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ सुरू केला. यावेळी स्वतः पीएम मोदी त्यांच्या खुर्चीवरून उठले आणि राहुल यांचे वक्तव्य गंभीर बाब असल्याचे सांगितले. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे, ही गंभीर बाब असल्याची टीका पंतप्रधान मोदींनी केली. याशिवाय, गृहमंत्री अमित शाह यांनी राहुल गांधींच्या माफीची मागणी केली.