राहुल गांधींच्या विरोधात कॉपीराइटची तक्रार; KGF-2 चित्रपटाशी संबंधित प्रकरण, जाणून घ्या नेमकं प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 12:53 PM2022-11-05T12:53:31+5:302022-11-05T12:56:06+5:30
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. केरळपासून सुरू झालेली यात्रा आता तेलंगणात येऊन पोहोचली. काँग्रेस नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्याविरोधात एका संगीत कंपनीने कॉपीराइटची तक्रार दाखल केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. केरळपासून सुरू झालेली यात्रा आता तेलंगणात येऊन पोहोचली. काँग्रेस नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेत आणि जयराम रमेश यांच्याविरोधात एका संगीत कंपनीने कॉपीराइटची तक्रार दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेतील व्हिडिओ मध्ये 'केजीएफ चॅप्टर २' चित्रपटातील संगीत विना परवानगी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बंगळूरु येथील एमआरटी म्युझिक कंपनीने ही तक्रार दाखल केली आहे. या कंपनीकडे या चित्रपटातील म्युझिकचे राइट्स आहेत. हिंदी चित्रपटातील संगीत या व्हिडिओमध्ये परवानगी न घेता वापरले असल्याचा आरोप यात कंपनीने केला आहे.
"हिंदीतील केजीएफ २ (KGF Chapter 2) च्या म्युझिकचे हक्क मिळवण्यासाठी मोठी गुंतवणूक केली आहे आणि काँग्रेसने 'स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी' या म्युझिकचा वापर केला आहे. हे म्युझिक आमची परवानगी न घेता वापरले आहे, असं या तक्रारीत म्हटले आहे.
"काँग्रेसने भारतीय नागरिकांसमोर उदाहरण मांडले पाहिजे, परंतु ते स्वतः कायद्याचे उल्लंघन करत आहे." आमच्या कॉपीराइट आणि बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करत आहे, जे आम्ही मोठ्या गुंतवणुकीद्वारे मिळवले आहे. काँग्रेसचे हे कृत्य जनतेला चुकीचा संदेश देते आणि कॉपीराइटचे संरक्षण करण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या अगदी विरुद्ध आहे, असं एमआरटी म्युझिकचे भागीदार एम नवीन कुमार यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे .
काँग्रेस नेते राहुल गांधी, सुप्रिया श्रीनेट आणि जयराम रमेश यांच्याविरुद्ध कंपनीच्या मालकीच्या कॉपीराइटचे उल्लंघन केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे.
गुजरात निवडणुकीसाठी 'आप'चा OTP फॉर्म्युला; काय आहे अरविंद केजरीवालांची रणनीती?
'केजीएफ-चॅप्टर २' चित्रपटाच्या हिंदी चित्रपटातील म्युझिकचे हिंदी व्हर्जन बेकायदेशीरपणे डाऊनलोड, सिंक्रोनाइझ आणि प्रसारित करून आणि 'भारत जोड यात्रा'च्या लोगोसह 'काँग्रेसच्या मालकीचे दाखवले आहे. हे सर्व व्हिडिओ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया साइटवर शेअर केले आहेत, असा आरोप आहे.