काँग्रेसने या मराठी नेत्याकडे सोपवली मध्य प्रदेशची जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 17:21 IST2020-04-30T17:06:13+5:302020-04-30T17:21:13+5:30
सुमारे १५ वर्षे मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर राहिल्यानंतर २०१८ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा जास्त जागा जिंकत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा मिळवली होती.

काँग्रेसने या मराठी नेत्याकडे सोपवली मध्य प्रदेशची जबाबदारी
नवी दिल्ली - मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि काही आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे काँग्रेसला गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमधील सत्ता गमवावी लागली होती. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये पक्षाला पुन्हा एकदा बळकटी देण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांची मध्य प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.
सुमारे १५ वर्षे मध्य प्रदेशमधील सत्तेपासून दूर राहिल्यानंतर २०१८ च्या अखेरीस झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपापेक्षा जास्त जागा जिंकत काँग्रेसने मध्य प्रदेशमधील सत्ता पुन्हा मिळवली होती. राज्यातील ज्येष्ठ नेते कमलनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. मात्र काँग्रेसकडे स्वबळावर स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांचे आसन सुरुवातीपासूनच डळमळीत होते. अखेरीस ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी आणि आमदारांच्या एका गटाने केलेल्या बंडखोरीमुळे कमलनाथ सरकार कोसळले.
त्यामुळे आता मध्य प्रदेशमध्ये सत्ता गमवावी लागल्याच्या धक्क्यातून पक्षाला सावरण्याचे आणि पक्षांतरामुळे विस्कटलेली प्रदेश काँग्रेसची घडी पुन्हा बसवण्याचे आव्हान मुकुल वासनिक यांच्यासमोर असेल.