CoronaVirus: दिल्ली पोलिसांची गौतम गंभीर यांना क्लीन चिट; हायकोर्टाला अहवाल सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 01:29 PM2021-05-17T13:29:19+5:302021-05-17T13:33:21+5:30
CoronaVirus: मोफत औषध वाटपप्रकरणी नेत्यांवर करण्यात येणारे आरोप चुकीचे असल्याचे पोलिसांनी रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या औषधांचे वाटप केल्याप्रकरणी भाजप खासदार गौतम गंभीर यांच्यावर काळाबाजार केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, दिल्लीपोलिसांनी या प्रकरणी गौतम गंभीर यांना क्लीन चिट दिली असून, यासंदर्भातील अहवाल दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला आहे. (coronavirus delhi police gives clean chit to Congress leader srinivas bv and gautam gambhir)
दिल्ली उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये मेडिकल माफिया आणि राजकारण्यांमध्ये संबंध असून, अवैधपणे औषधांचे वाटप केले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आरोप झालेल्या नेत्यांमध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास, आमचे आमदार दिलीप पांडे आणि भाजपा खासदार गौतम गंभीर यांच्यासह इतरांचा समावेश होता. यानंतर क्राइम ब्रांचकडून श्रीनिवास, गंभीर यांच्यासह इतरांची चौकशी करण्यात आली. यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास करून आपला तपास अहवाल न्यायालयाला सादर केला.
अरेरे! घरात विलगीकरणासाठी जागा नाही; पठ्ठ्याने झाडावर काढले तब्बल ११ दिवस
घोटाळ्याचा आरोप चुकीचा
दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय की, आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात औषधांचा काळाबाजार केल्याचा आरोप झालेले हे सर्वजण लोकांना औषधे, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि हॉस्पिटल बेड्सच्या स्वरुपात वैद्यकीय मदत मिळवून देत होते. यावेळी त्यांनी मदत केलेल्यांकडून एक रुपयाही घेतला नाही. यामुळे त्यांच्यावर होणारा घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. वाटप किंवा मदत ही कोणताही भेदभाव न करता सुरु होती, असे पोलिसांनी सांगितले.
योगी आदित्यनाथ मैदानात; १० दिवसांत ११ ठिकाणी दौरे, परिस्थितीचा घेतला आढावा
जबाब न्यायालयाला सादर
पोलिसांनी आपल्या तपास अहवालासोबत श्रीनिवास, गंभीर, पांडे, दिल्ली काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चौधरी अनिल कुमार, माजी काँग्रेस आमदार मुकेश खुराना, दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहदी, काँग्रेस नेते अशोक बघेल आणि माजी खासदार शाहीद सिद्धीकी यांचे नोंदवण्यात आलेले जबाबही सादर केले आहेत.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत २ लाख ८१ हजार ३८६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ लाख ७८ हजार ७४१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, याच कालावधीत ४ हजार १०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत १८ कोटी २९ लाख २६ हजार ४६० जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.