CoronaVirus News: "आपण धोकादायक वळणावर आहोत; कोरोना लाटेचं रूपांतर त्सुनामीत होऊ शकेल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2021 03:51 AM2021-04-08T03:51:12+5:302021-04-08T07:32:29+5:30
काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : कोराेनाच्या वाढत्या फैलावाला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट जबाबदार धरून “आम्ही धोकादायक वळणावर उभे आहोत आणि कोविडला सध्या आम्ही लाट म्हणत असलो तरी ती कधी त्सुनामीत रूपांतरित होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे म्हटले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारला इशारा देत आले आहेत की, “कोरोना संपलेला नाही. आम्हाला दुसऱ्या लाटेला तोंड देण्यास तयार व्हावे लागेल. कारण परिस्थिती १७ सप्टेंबर, २०२० पेक्षा जास्त भयानक होणार आहे.”
काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.
पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी भाष्य केले की, “मोदी - शहा यांची जोडी निवडणूक जिंकण्यासाठी एक हजारचे कूपन वाटण्यात व्यस्त आहेत. कोरोनाकडे सरकारचे लक्ष नाही. जगातील प्रत्येक सात रुग्णांतील एक भारतीय आहे. आधी कोरोनाचे १० रुग्ण आणखी आठ जणांना बाधित करायचे. ताज्या लाटेत कोविडचे १० रुग्ण १४ जणांमध्ये आजार पसरवत आहेत. ही भयानक परिस्थिती आहे.”
खेडा यांचा युक्तिवाद होता की, “जगातील तज्ज्ञ म्हणत आहेत की, कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे; परंतु सरकारला याची माहिती नसावी, असे दिसते.” त्यांनी लसीची टंचाई, दुसऱ्या लसीला मंजुरी न दिल्या जाण्याचाही मुद्दा उपस्थित केला. पक्षाने पंतप्रधानांना आवाहन केले की, या महामारीशी एकत्रित लढावे. सगळे लोक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून यायला तयार आहेत.