coronavirus : टेस्टिंग किट्स आणि कोरोना चाचण्यांवरून राहुल गांधींचे मोदी सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 05:17 PM2020-04-14T17:17:11+5:302020-04-14T17:23:08+5:30
कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने मोदी सरकारविरोधात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली असून, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांच्या आकडा दहा हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अपयश येत असल्याने देशातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडूनकेंद्र सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाची चाचणी आणि टेस्टिंग किट्सच्या उपलब्धतेवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'कोरोनविरोधातील लढाईमध्ये कोरोनाची चाचणी होणे महत्त्वपूर्ण असते. मात्र कोरोनाचा चाचण्या घेण्याच्या बाबतीत आपण लाओस, नायजर, होंडुरास या देशांच्या सोबत उभे आहोत. या देशांमध्ये दर दहा लाख लोकांमागे अनुक्रमे 157, 182 आणि 162 चाचण्या होत आहेत.
'कोरोनाच्या टेस्टिंग किट खरेदी करण्याच्या बाबतीत आपल्या देशाने बराच उशीर केला. त्यामुळे सध्या टेस्टिंग किट्सची मोठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. कोरोना चाचणीच्या सारसरीचा विचार केल्यास आपण लाओस, नायजर, होंडुरास अशा देशांसोबत उभे आहोत. मोठ्या प्रमाणावर केलेल्या कोरोना चाचण्या या लढाईत फायदेशीर ठरू शकतात. मात्र आज आपण याबाबतीत जगाच्या तुलनेत खूप मागे आहोत,' असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले.
दरम्यान, संपूर्ण देशात एकाच प्रकारे लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने कोट्यवधी शेतकरी, मजूर आणि व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे जिथे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत ते भाग वगळून इतर भागात हळूहळू व्यवहार सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा संदेश प्रसारित होण्यापूर्वी केली होती.