coronavirus: ना पॅकेज, ना प्लॅन; १७ मेनंतर करणार काय? सोनिया गांधींचा केंद्र सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 01:02 PM2020-05-06T13:02:15+5:302020-05-06T13:07:13+5:30
लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण केले आहे. दरम्यान, लॉकडाऊन केल्यानंतरही देशातील कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयश येत असल्याने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 17 मेनंतर काय आणि कशी वाटचाल असणार? 17 मेनंतर लॉकडाऊनबाबत मोदी सरकारची काय रणनीती आहे? अशी विचारणा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारकडे केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना आणि लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीमध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही आपली मते मांडली. कोरोनाचा सामना करत असताना वयस्कर, मधुमेह आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणेही गरजेचे आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले. तर माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कोरोनामुळे राज्यांसमोरील आर्थिक संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. तसेच या परिस्थितीतीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही कुठल्याही प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
या बैठकीला उपस्थित असलेल्या राजस्थान, पंजाब, छत्तीसगड आणि पुदुचेरीच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारने राज्यांना मदत पॅकेज देण्याची मागणी केली. ‘ जोपर्यंत व्यापक मदत पॅकेज दिले जात नाही, तोपर्यंत राज्य आणि देश कसा चालेल. आम्ही १० हजार कोटींचा महसूल गमावला आहे. राज्य सरकारांना मदतीबाबत पंतप्रधानांना वारंवार विनंती केली. पण पंतप्रधानांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सांगितले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘सोनियाजी म्हणतात त्याप्रमाणे लॉकडाऊन ३.० नंतर काय? सरकारकडे पुढच्या परिस्थितीबाबत काय योजना आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यानंतरच्या धोरणाबाबत माहिती असले पाहिजे.’
दरम्यान, या बैठकीस उपस्थित असलेल्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत केंद्र सरकारच्या दृष्टीकोनावर टीका केली आहे. तर राज्याला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले. तर पंजाबप्रमाणेच पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री नारायणसामी यांनी कोरोनाच्या झोननुसार विभागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.