अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 09:10 PM2023-10-22T21:10:03+5:302023-10-22T21:27:01+5:30
देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले.
नवी दिल्ली : भारतमातेचे रक्षण करताना देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. मागील वर्षी वादग्रस्त ठरलेल्या अग्नीवीर योजनेद्वारे अनेक तरूण सैन्यात भरती झाले. यातील एका अग्निवीर जवानाला देशाचे रक्षण करताना हौतात्म्य आले. लडाखच्या सियाचीन ग्लेशियरमध्ये तैनात असलेले अग्निवीर (ऑपरेटर) अक्षय लक्ष्मण गवते यांना हौतात्म्य आले. विशेष बाब म्हणजे ऑनड्युटी शहीद झालेले अक्षय पहिले अग्निवीर आहेत. अक्षय शहीद झाल्यानंतर विविध क्षेत्रातील दिग्गजांनी भारतमातेच्या सुपुत्राला सलाम ठोकला. अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अक्षय यांच्या कुटुंबीयांसाठी आवाज उठवला आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करताना म्हटले, "अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण हे सियाचीनमध्ये शहीद झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना. एक जवान देशासाठी शहीद झाला पण ग्रॅच्युइटी नाही, त्याच्या सेवेदरम्यान इतर कोणत्याही लष्करी सुविधा नाहीत आणि शहीद झाल्यावर त्याच्या कुटुंबाला पेन्शन देखील नाही. अग्निवीर म्हणजे भारताच्या वीरांचा अपमान करण्याचा डाव आहे." एकूणच शहीद जवानाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून पेन्शन देण्याची मागणी राहुल गांधींनी केली आहे.
सियाचिन में, अग्निवीर गवाते अक्षय लक्ष्मण की शहादत का समाचार बहुत दुखद है। उनके परिवार को मेरी गहरी संवेदनाएं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 22, 2023
एक युवा देश के लिए शहीद हो गया - सेवा के समय न ग्रेच्युटी न अन्य सैन्य सुविधाएं, और शहादत में परिवार को पेंशन तक नहीं।
अग्निवीर, भारत के वीरों के अपमान की योजना है! pic.twitter.com/8LcQpZR9f2
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पिंपगळगाव सराईचे रहिवासी अक्षय गवते (२३) यांच्या हौतात्म्याबद्दल भारतीय लष्कराने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती दिली. तसेच, या दुःखाच्या प्रसंगी आम्ही गवते कुटुंबासोबत खंबीरपणे उभे असल्याचेही सांगितले. दरम्यान, अक्षय यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती आहे.
जनरल मनोज पांडे यांनी श्रद्धांजली वाहिली
सियाचीनच्या दुर्गम उंचीवर कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि भारतीय लष्कराच्या सर्व स्तरातील अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. जवान अक्षय, कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्यांचे आईवडील शेती करतात. मृत्यूची माहिती मिळताच पिंपळगाव सराईमध्ये शोककळा पसरली आहे. 23 ऑक्टोबर रोजी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.