आता 'या' राज्यात होणार कर्नाटकची पुनरावृत्ती?; काँग्रेसला सत्ता जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:02 PM2019-07-23T22:02:22+5:302019-07-23T22:04:32+5:30
भाजपाकडून पुन्हा एकदा 'ऑपरेशन लोटस' राबवलं जाण्याची शक्यता
भोपाळ: भाजपाचं ऑपरेशन लोटस कर्नाटकमध्ये यशस्वी झालं. बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्यानं मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामींनी पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस, जेडीएसच्या १५ आमदारांनी राजीनामे दिल्यानं कर्नाटक सरकार अडचणीत आलं होतं. अखेर आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्यात आला. त्यात ९९ आमदारांनी सरकारच्या बाजूनं, तर १०५ आमदारांनी सरकारच्या विरोधात मतदान केलं. कर्नाटकमधील ऑपरेशन लोटस यशस्वी झाल्यानंतर आता मध्य प्रदेशात 'ऑपरेशन कमलनाथ' राबवलं जाण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती काँग्रेस आमदारांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सूचक विधान केलं. 'आम्ही इथे (मध्य प्रदेशात) सरकार पाडणार नाही. काँग्रेस सरकार पडण्यास त्यांचेच नेते जबाबदार आहेत. राज्यात काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या बसपा-सपामध्ये अंतर्गत वाद आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही घडल्यास आम्ही काहीही करू शकत नाही,' असं म्हणत चौहान यांनी अप्रत्यक्षपणे 'ऑपरेशन लोटस'चे संकेत दिले आहेत.
Shivraj Singh Chouhan, BJP: We'll not cause the fall of govt here (Madhya Pradesh). Congress leaders themselves have been responsible for fall of their govts. There is an internal conflict in Congress, & support of BSP-SP, if something happens to that then we can't do anything. pic.twitter.com/1w25KOw2RK
— ANI (@ANI) July 23, 2019
कर्नाटक प्रमाणे मध्य प्रदेशात भाजपा पहिल्या क्रमांकाचा पक्ष नसला, तरी काँग्रेस आणि भाजपाच्या जागांमध्ये फारसा फरक नाही. गेल्या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. २३० सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेशच्या विधानसभेत काँग्रेसचे ११४, भाजपाचे १०९ आमदार आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी ११६ आमदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. सध्या सपा-बसपाच्या पाठिंब्यानं काँग्रेसनं सत्तेत असून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कमलनाथ यांच्याकडे आहे. कर्नाटकप्रमाणेच मध्य प्रदेशात काँग्रेसच्या नाराज आमदारांनी राजीनामे दिल्यास राज्याची सत्ता भाजपाला मिळू शकते.