"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 06:25 PM2024-10-01T18:25:45+5:302024-10-01T18:26:27+5:30
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
Rahul Gandhi on BJP : हरियाणातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यभरात सर्वच पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीदेखील राज्यात जोरदार प्रचार करत आहेत. मंगळवारी(1 ऑक्टोबर) त्यांनी बहादुरगडमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या मुलाच्या लग्नावर करोडो रुपये खर्च केले, पण शेतकरी कर्ज काढून मुलांचे लग्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, "तुम्ही अंबानींचे लग्न पाहिले आहे का? अंबानींनी लग्नात करोडो रुपये खर्च केले. हा पैसा कोणाचा आहे? हा तुमचा पैसा आहे. तुम्ही तुमच्या मुलांच्या लग्नासाठी बँकेतून कर्ज घेता, पण नरेंद्र मोदींनी एक अशी सिस्टीम बनवली आहे, ज्यात निवडक 25 लोक लग्नावर करोडो रुपये खर्च करू शकतात. हा संविधानावर हल्ला नाही, तर काय आहे? पीएम मोदी, अदानी आणि अंबानींना जेवढे पैसे दिले, तेवढेच पैसे आम्ही गरिबांना देऊ," असे राहुल यावेळी म्हणाले.
भाजप संविधानावर हल्ला करत आहे
"भाजप सातत्याने संविधानावर हल्ला करत आहे. आरएसएसचे लोक आपल्या लोकांना देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये बसवतात, दलित आणि मागासवर्गीयांचे हक्क हिरावून घेतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहे. पंतप्रधान मोदी अदानी आणि अंबानींना मदत करतात आणि देशाची रोजगार व्यवस्था उद्ध्वस्त करतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहेत. भाजप संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आम्ही त्याचे रक्षण करतोय. पंतप्रधान मोदी अब्जाधीशांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करतात आणि शेतकरी आणि विद्यार्थ्यांचे कर्ज माफ करत नाहीत, तेव्हा ते संविधानावर हल्ला करत आहेत. अदानीला मदत करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तीन कृषी कायदे आणतात, तेव्हा हा संविधानावर हल्ला आहे," अशी बोचरी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.
काँग्रेसची सत्ता आल्यास 500 रुपयांना सिलेंडर मिळेल
"हरयाणामध्ये ज्या रोजगाराच्या संधी होत्या, त्या बंद झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी म्हणायचे की गॅस सिलिंडरची किंमत 400 रुपये झाली आहे. पण, आज ती 1200 रुपये आहे. काँग्रेस सत्तेत येईल, तेव्हा आम्ही सिलेंडरची किंमत 500 रुपये करू. हरियाणातील महिलांच्या खात्यात 2000 रुपये टाकू. राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही. आमचे सरकार आल्यावर आम्ही योग्य भावात पीक खरेदी करू," असेही ते यावेळी म्हणाले.
राहुल पुढे म्हणतात, "आम्ही शेतकऱ्यांना एमएसपी देऊ. पूर्वी तुरुंगातून खंडणीचे फोन यायचे, मात्र आता परदेशातून फोन येतात. हरियाणा सरकारने बेरोजगारीचे जाळे पसरवले आहे. 2 लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. काँग्रेस सरकार ही रिक्त पदे भरणार आहे. गरिबांना 100 यार्डच्या प्लॉटसाठी 3.5 लाख रुपये आणि 2 बेडरूमचे घर, 300 युनिट मोफत वीज आणि 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा देण्यात येईल," अशी आश्वासने राहुल यांनी यावेळी दिली.