वेश्यागृहातील ग्राहकही कायद्यानुसार आरोपी, केरळ उच्च न्यायालयाने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 07:33 AM2024-01-03T07:33:31+5:302024-01-03T07:34:40+5:30
हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही.
डॉ. खुशालचंद बाहेती -
तिरुवनंतपुरम : वेश्यागृहातील ग्राहकाला अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा, १९५६ अंतर्गत खटल्यात आरोपी केले जाऊ शकते, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
एक ग्राहक वेश्यालयात सापडला. त्याला पोलिसांनी कलम ३ (वेश्यालय चालवणे), ४ (वेश्या व्यवसायाच्या कमाईवर जगणे), ५ (वेश्येची खरेदी), ७ (सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसाय) अंतर्गत आरोपी केले. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर त्याने जिल्हा कोर्टात दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला. परंतु, तो फेटाळण्यात आला. जिल्हा कोर्टाच्या निर्णयास त्याने हायकोर्टात आव्हान दिले. त्याचा युक्तिवाद होता की, त्याने अनैतिक वाहतूक कायद्याची ३, ४ व ७ मध्ये नमूद वेश्या व्यवसायाचा गुन्हा केलेला नाही. तो त्या ठिकाणचा ग्राहक होता. त्यामुळे तो कलम ५ चा अपराधी ठरत नाही
खरेदी हा अपराध
हायकोर्टाने निरीक्षण नोंदवले की, अनैतिक वाहतूक कायद्याचे कलम ५ मध्ये वेश्या व्यवसायासाठी एखाद्या व्यक्तीची “खरेदी करणे” हा अपराध आहे. तथापि, हा कायदा “खरेदी करणे” या शब्दाची व्याख्या करत नाही.
त्यामुळे “खरेदी करणे” हा शब्द ज्या संदर्भात वापरला आहे ते समजून घेणे आवश्यक आहे. हायकोर्टाने त्याला कलम ३, ४ व ७ मधून मुक्त केले. पण, त्याच्या विरुद्धचा कलम ५ चा खटला रद्द करण्याची विनंती फेटाळली
अनैतिक वाहतूक कायद्याचा उद्देश महिलांचे व्यापारीकरण आणि तस्करी रोखणे हा आहे. खरेदी करणे याचा अर्थ एखाद्या गोष्टीचा ताबा मिळवणे आहे. त्यामुळे जो कोणी एखाद्या व्यक्तीला वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने मिळवतो तो अनैतिक वाहतूक कायद्याच्या कलम ५ च्या कक्षेत येतो.
- न्या. पी. जी. अजितकुमार