राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु, डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 12:52 PM2017-11-20T12:52:00+5:302017-11-20T14:59:44+5:30
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर केली आहे. आज दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींसोबत वरिष्ठ नेते हजर होते. काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी सूचना जारी करण्यात येईल. 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मदत असणार आहे. अर्जांची छाननी करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 5 डिसेंबरला राहुल गांधी वगळता इतर कोणताही अर्ज न झाल्यास ही निवडणूक बिनविरोध झाल्याचं जाहीर करण्यात येईल.
राहुल गांधी सध्या काँग्रेस उपाध्यक्ष असून, अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताच जास्त आहे. जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार, 4 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून 5 डिसेंबरपर्यंत अर्जांची छाननी होणार आहे. 11 डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे, तर 16 डिसेंबरला गरज पडल्यास मतदान घेण्यात येईल. पण सध्या तरी या स्पर्धेत राहुल गांधी एकमेव आहेत.
Congress CWC passes resolution to make Rahul Gandhi party President. pic.twitter.com/kNaVtwOnYB
— ANI (@ANI) November 20, 2017
सोनिया गांधींच्या निवासस्थानी 10 जनपथवर काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पडल्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. अंतर्गत निवडणुका पुर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाला वर्षाअखेपर्यंतची मुदत दिली आहे.
In case there is no candidate apart from Rahul Gandhi, Congress will announce his candidature on the last date of scrutiny.
— ANI (@ANI) November 20, 2017
आई किंवा मुलगा या दोघांचीच काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊ शकते - मणिशंकर अय्यर
याआधी काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पक्षाध्यक्षपदाच्या नेमणुकीसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवा वाद निर्माण जाला होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी फक्त दोन व्यक्तींची निवड होऊ शकते, आई किंवा मुलगा असे खळबळजनक विधान मणिशंकर अय्यर यांनी केले होते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लवकरच सोनिया गांधींकडून पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणार आहेत या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मणिशंकर अय्यर यांनी हे धक्कादायक विधान केले होते. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची गरज असते. फक्त एकच उमेदवार असेल तर, निवडणूक कशी होणार ? असा सवाल मणिशंकर अय्यर यांनी विचारला होता.