धक्कादायक! आदिवासी युवकाला MP मध्ये तालिबानी शिक्षा; पिकअपमागे बांधून ओढत नेलं, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 08:16 PM2021-08-28T20:16:21+5:302021-08-28T20:16:39+5:30
ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली
नीमच – मध्य प्रदेशातील नीमच इथं माणुसकीला काळीमा फासणारी भयनाक घटना घडली आहे. याठिकाणी एका गरीब आदिवासी युवकाला काही टवाळखोरांनी उघडपणे पिकअप वाहनाच्या मागे बांधून ओढण्यात आणलं. या घटनेत ८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यातील ४ जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत ज्यात मुख्य आरोपीचाही समावेश आहे. पोलीस इतर चौघांचा शोध घेत आहे.
ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली. त्यानंतर आदिवासी युवक भैया लाल भील याला बांधून ओढत मारहाण केली. या घटनेनंतर युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. २६ ऑगस्टला ही निर्दयी घटना घडल्याचं सांगितले जात आहे. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
नीमच घटनेबाबत एसपी सूरज कुमार वर्मा यांनी माहिती दिली की, या घडलेल्या घटनेनंतर ८ जणांना आरोपी बनवण्यात आले आहेत. ज्यात प्रमुख आरोपी छीतरमल गुर्जर, महेंद्र गुर्जर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पिकअप गाडी चालक आणि सहचालकालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून बाकी आरोपींनाही लवकरात लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी सांगितले आहे.
काँग्रेसनं साधला निशाणा
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेबाबत ट्विट करत म्हटलंय की, मध्य प्रदेशात हे काय चाललंय? नीमच जिल्ह्यात आदिवासी युवकाला बेदम मारहाण केली जाते. चोरीच्या संशयावरुन त्याला इतकं निर्दयी मारहाण करून एका वाहनाच्या सहाय्याने ओढत नेलं जातं. त्यात या युवकाचा मृत्यू होतो. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे राज्यात दहशतीचं वातावरण तयार झालं आहे. लोकं बिनधास्तपणे कायदा हातात घेत आहेत. कायद्याची भीती उरली नाही. सरकार नावाची गोष्टही दिसून येत नाही. अशा घटनांना तात्काळ रोखलं पाहिजे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्यात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखावा अशी मागणी त्यांनी केली.