जनतेने दिलेला निर्णय मान्य - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 04:51 AM2019-05-24T04:51:54+5:302019-05-24T04:52:37+5:30
जनतेने निर्णय दिला आहे. विजयाबद्दल मी मोदी यांचे अभिनंदन करतो. ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.
- शीलेश शर्मा
निवडणुकीच्या निकालातून जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे आणि काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, असे स्पष्ट करीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी आपण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली असून याबाबत कार्यकारिणी अंतिम निर्णय घेणार आहे, असेही स्पष्ट केले. परंतु कार्यकारिणीने गांधी यांनी अशा प्रकारे राजीनामा दिल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हैराण झालेल्या काँग्रेसला या पराभवामागची काय कारणे असावीत, हेच उमजेनासे झाले आहे.
राहुल गांधी यांनी पराभवाच्या कारणांवर टिप्पणी करण्यास इन्कार करतांना सांगितले की, जनतेने दिलेला निर्णय मला मान्य आहे. आजच निकाल आलेला असल्याने आम्ही त्यासंबंधित कोणत्याही मुद्यांवर प्रतिक्रिया देणार नाही.
उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासंदर्भात विचारले असतांना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, हा मुद्या माझ्या आणि कार्यकारिणी यांच्यातील आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष लवकरच कार्यकारिणीची बैठक बोलाविणार आहे. या बैठकीत पराभवाच्या कारणांची मीमांसा करण्यासोबत राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केल्यासंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. आतापर्यंत मिळालेल्या संकेतानुसार कार्यकारिणी राहुल गांधी यांना अध्यक्षपद सांभाळण्याचा सल्ला देईल.
जनता मालक आहे, असे मी प्रचारादरम्यान म्हणालो होतो, याची आठवण देत राहुल गांधी म्हणाले की, जनतेने आपला निर्णय दिला
आहे. विजयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. तथापि, ही विचारांची लढाई आहे. आमचा लढा चालूच राहिल आणि आम्ही विजयी होऊन दाखवू.
अमेठीतील पराभव मान्य करुन राहुल यांनी स्मृती इराणी यांचेही अभिनंदन केले. अमेठीतील जनतेची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.
काँग्रेसचे उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांना न खचता संघर्ष चालू ठेवण्याचा सल्ला दिला. प्रचारादम्यान विरोधकांकडून माझी अनेकदा निंदा करण्यात आली. असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला. अनेक आरोप करण्यात आले; परंतु, मी त्यांना प्रेमानेच उत्तर दिले. भविष्यातही मी असा वागणार आहे; कारण प्रेमाचा कधीही पराभव होत नसतो.
पत्रकार परिषदेत त्यांच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्ट दिसून येत होती. राहुल गांधी हताश झालेले दिसले. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतांनाही ते पुरते गोंधळून गेलेले दिसले. अनेक प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. काँग्रेसच्या पराभवामागच्या कारणांबाबत नंतर सविस्तर बोलू, असेही राहुल गांधी यांनी नमूद केले.