"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 08:16 IST2025-01-14T08:16:02+5:302025-01-14T08:16:16+5:30
Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला.

"PM मोदी आणि केजरीवालांमध्ये काही फरक नाही, खोटं बोलण्यात दोघेही सारखेच"; राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi vs Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्लीत पहिली सभा घेतली. पण यावेळी त्यांनी भाजपपेक्षा आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर जास्त टीका केली. नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखेच आहेत. दोघेही अदानीबद्दल एक शब्दही बोलत नाहीत, अशा शब्दात राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात आणि प्रसारमाध्यमांमध्ये एकामागून एक खोटी आश्वासने देतात, तसे केजरीवालही करतात, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी सोमवारी सीलमपूर विधानसभा मतदारसंघात दिल्ली निवडणुकीतील पहिली सभा घेतली. पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला. शीला दीक्षित यांच्या सरकारच्या काळाची आठवण करून देत राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. आठवतेय का ती दिल्ली? केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. तुम्हीच बघा, आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, खूप प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते की अरविंद केजरीवाल भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?," अस सवाल राहुल गांधी यांनी केला.
"नरेंद्र मोदी जसा प्रचार करतात तसाच प्रचार अरविंद केजरीवाल करतात. फारसा फरक नाही. हेच सत्य आहे. तुम्हाला माहिती आहे का, जर कोणी कोणत्याही भारतीयाविरुद्ध हिंसाचार केला, मग त्याची जात-धर्म असो, तर राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष तिथे सापडतील. त्यांच्यात आणि आमच्यात हाच फरक आहे. जेव्हा तुम्हाला गरज असेल, तुमच्यावर हिंसाचार होईल तेव्हा आम्ही तिथे उभे राहू," असंही राहुल गांधी म्हणाले.
अरविंद केजरीवालांचा पलटवार
दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर जोरदार पलटवार केला. "आज राहुल गांधी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिवीगाळ केली. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे, माझी लढाई देश वाचवण्यासाठी आहे," असं अरविद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी भाजपवरही आरोप केले होते. "नवी दिल्ली विधानसभेत भाजपची हेराफेरी स्पष्टपणे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या संगनमताने बनावट मते बनवून पैसे, बेडशीट, चष्मा वाटण्याचा हा खेळ सुरू आहे. आज आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेऊन या गैरप्रकारात सहभागी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली," असं अरविंद केजरीवाल म्हणाले.