Delhi Asssembly Elections 2020: काँग्रेस उमेदवारांची तिसरी यादी जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:24 AM2020-01-21T11:24:41+5:302020-01-21T11:26:17+5:30
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे.
नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत काँग्रेसनं पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसनं ओखलामधून परवेझ हाश्मीला मैदानात उतरवलं आहे. तसेच मादीपूरमधून जयप्रकाश पवार आणि विकासपुरीमधून मुकेश शर्मा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याशिवाय ब्रिजवासन आणि महरौलीमधूनही उमेदवारांची घोषणा केली आहे. या दोन्ही जागांवरून काँग्रेसनं क्रमशः प्रवीण राणा आणि मोहिंदर चौधरी यांना तिकीट दिलं आहे.
काँग्रेसनं आतापर्यंत 70 पैकी 66 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली होती. त्यात 54 जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये तब्बल 32 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर 14 आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीनंतर त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जात आहे.
Congress announces another list of 5 candidates for Delhi elections. #DelhiElections2020pic.twitter.com/yAe3cjNOq8
— ANI (@ANI) January 21, 2020
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुभाष चोपडा यांची मुलगी शिवानी चोपडांपासून, तर प्रचार समिती प्रमुख कीर्ती आझाद यांच्या पत्नी पूनम आझाद यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. जवळपास डझनभर असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी पक्षातील नेत्यांच्या मुला-मुलींना, पत्नी, सून इत्यादींना तिकिट देण्यात आले आहे.दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. भाजपाने 17 जानेवारीला 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर भाजपाने उर्वरित उमेदवारांची यादी जाहीर केली असून, केजरीवालांविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. भाजपाने राहिलेल्या 10 जागांवर तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना हरीनगर, नांगलोई जाटहून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डनहून रमेश खन्ना, नवी दिल्लीहून सुनील यादव, शाहदराहून संजय गोयल, कृष्णानगरहून अनिल गोयल, महरौलीहून कुसुम खत्री, कालकाजीहून धर्मवीर सिंह आणि कस्तूरबानगरहून रवींद्र चौधरी यांना तिकीट देण्यात आले आहे. तर दिल्लीमध्ये युतीमुळे दोन जागा जदयूला देण्यात आल्या आहेत. यामध्ये संगम बिहार आणि बुराडी या जागा आहेत. तर एक जागा लोजपाला सोडण्यात आली आहे.