२४ तासात ट्विट डिलीट करा', स्मृती इराणींच्या विनंतीवरून हायकोर्टाने 3 काँग्रेस नेत्यांना बजावले समन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:24 PM2022-07-29T14:24:20+5:302022-07-29T14:24:48+5:30
Smriti Irani Defamation Case: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली.
Smriti Irani Defamation Case: स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर दिल्ली उच्च न्यायालयानेकाँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले आहे. या नेत्यांनी आपल्या मुलीवर लावलेल्या आरोपांमुळे स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने या काँग्रेस नेत्यांनी सोशल मीडियावर केलेल्या टिप्पण्या २४ तासांत काढून टाकण्यास सांगितले. उच्च न्यायालय पुढे म्हणालं, त्यांनी कमेंट हटवली नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म या कमेंट्स काढून टाकावा, स्मृती इराणींनी मानहानीचा आरोप करत 20 कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
तथ्य न तपासता आरोप- हायकोर्ट
या प्रकरणी न्या. मिनी पुष्करणा म्हणाले, 'मला प्रथमदर्शनी असे वाटते की (स्मृती आणि त्यांच्या मुलीवर) हे आरोप तथ्यांची पडताळणी न करता करण्यात आले आहेत. यामुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. त्यामुळे ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पत्रकार परिषदेत केलेले आरोप काढून टाकण्याचे निर्देश न्यायालय देत आहे.
२४ तासांच्या आत ट्विट हटवायचे
न्यायालयाने म्हटले आहे की, जर प्रतिवादींनी 24 तासांच्या आत त्याच्या निर्देशांचे पालन केले नाही तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूबने स्वतः संबंधित सामग्री काढून टाकावी. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुलगी गोव्यात अवैध बार चालवत असल्याचा आरोप करत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर इराणी यांनी ही कायदेशीर कारवाई केली.
असे काँग्रेस नेते म्हणाले
न्यायालयाचे समन्स जारी केल्यानंतर काँग्रेस नेते जयराम नरेश म्हणाले की, ते आणि या प्रकरणात गुंतलेले इतर काँग्रेस नेते सर्व तथ्य न्यायालयासमोर ठेवतील आणि केंद्रीय मंत्र्यांचे हे प्रकरण सौम्य करण्याचा प्रयत्न हाणून पाडतील. त्यांनी ट्विट केले की, 'दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या प्रकरणावर औपचारिकपणे उत्तर देण्यास सांगितले आहे. न्यायालयासमोर वस्तुस्थिती मांडण्यास आम्ही उत्सुक आहोत. स्मृती इराणी ज्या पद्धतीने हे प्रकरण चिघळवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आम्ही आव्हान देऊ आणि हाणून पाडू.