राहुल गांधींच्या प्रयत्नानंतरही काँग्रेसच्या 'हाता'तून बसपाचा 'हत्ती' निसटला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 09:23 AM2018-10-05T09:23:38+5:302018-10-05T09:24:52+5:30
मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे
नवी दिल्ली - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा बसपाप्रमुख मायावती यांनी नुकतीच केली होती. मायावती यांच्या या निर्णयामुळे 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाविरोधात महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये बसपासोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही बसपाचा हत्ती काँग्रेसच्या हातातून निसटल्याची माहिती समोर येत आहे.
2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभे करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या महिन्यात तीन राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्याची योजना त्यांनी आखली आहे. त्यासाठी तिन्ही राज्यांमधील छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न आहे. मात्र मायावतींच्या भूमिकेमुळे राहुल गांधींच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे.
राहुल गांधींनी अखेरच्या क्षणापर्यंत बसपासोबत आघाडीसाठी प्रयत्न केले. बसपाला सोबत घेण्यासाठी त्यांनी पक्षाच्या मध्य प्रदेशमधील कार्यकारिणीचीही मनधरणी केली होती. बुधवारी अखेरच्या क्षणी मध्य प्रदेश अध्यक्ष कमलनाथ यांना फोन करून आघाडीसाठी शेवटचा प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्यानंतर कमलनाथ आणि बसपाचे महासचिव सतीशचंद्र मिश्रा यांच्यात बैठक झाली. मात्र या चर्चेचा निष्कर्ष समोर येण्याआधीच बसपाप्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडी न करण्याची घोषणा केली. काँग्रेससोबत आघाडी न करण्याची घोषणा करतानाच मायावती यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याने दोन्ही पक्षांमधील वातावरण अधिकच गढुळ झाले आहे.