कमलनाथ यांना बागेश्वर बाबांच्या आश्रमात जाऊन फायदा झाला का? निकालातून झाले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 08:57 PM2023-12-03T20:57:48+5:302023-12-03T20:59:49+5:30
मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे पारडे आधी जड दिसले. यावेळी विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी हिंदुत्वाचे कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचाही फायदा झालेला नाही.
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळाले आहे. काँग्रेसचा जोरदार पराभव झाला असून मोदी यांच्या जादूसह शिवराज सिंह यांची 'लाडली योजना' हे विजयाचे प्रमुख कारण मानले जात आहे. तर काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर कमलनाथ यांना घेरले असून बाबा बागेश्वर चर्चेत आले आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी बागेश्वर बाबा यांच्या आश्रमात भेट दिली होती. पण काँग्रेसला त्याचा काही फायदा झालेला दिसत नाही.
भ्रष्टाचारी सरकारला मतदारांनी हद्दपार केले; PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
बाबा बागेश्वर यांच्या आश्रमा परिसरात काँग्रेसची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. बिंद, बुंदेलखंड, चंबळ-ग्वाल्हेरचा समावेश असलेल्या मध्य प्रदेशातील सुमारे २६ विधानसभा जागांवर बाबा बागेश्वर यांचा प्रभाव आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार २६ पैकी १८ जागांवर भाजपची मोठी आघाडी आहे. चंबळ-ग्वाल्हेर पट्ट्यात बहुजन समाज पक्षानेही काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अनेक जागांवर बसपा तिसर्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, सिंधिया यांच्या भागातही काँग्रेसची कामगिरी खूपच खराब झाली आहे. भाजपच्या विजयानंतर पक्ष बदलल्यानंतरही ज्योतिरादित्य सिंधिया यांची जादू कायम असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी भाजपप्रमाणे हिंदुत्वाचे कार्ड खेळले होते, पण त्याचा त्यांना काहीही फायदा झालेला दिसत नाही. निवडणूक रॅलीदरम्यान कमलनाथ यांनी अयोध्या राम मंदिराचाही उल्लेख केला होता आणि ते कुलूप काँग्रेसने उघडल्याचे सांगितले होते. मात्र, कमलनाथ यांचे हिंदुत्व कार्ड अयशस्वी ठरले आणि बाबा बागेश्वर यांच्या आश्मात जाऊनही त्यांना फायदा झाला नाही, हे निकालावरून स्पष्ट झाले आहे.