कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 09:59 AM2018-09-05T09:59:08+5:302018-09-05T10:02:00+5:30

राहुल गांधींच्या जेवणावरुन वाद निर्माण झाल्यानंतर हॉटेलकडून स्पष्टीकरण

Did Rahul Gandhi eat non veg food during Kailash Mansarovar Yatra Restaurant clarifies | कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

कैलास-मानसरोवर यात्रेवेळी राहुल गांधींनी नॉन व्हेज खाल्लं?... वाचा हॉटेल मालकाचं म्हणणं

Next

नवी दिल्ली: कैलास मानसरोवर यात्रेला गेलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वादात सापडले आहेत. राहुल गांधींनी यात्रेदरम्यान मांसाहार केल्याचं वृत्त नेपाळमधील प्रसारमाध्यमांनी दिल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर टीका केली आहे. कैलास मानसरोवर यात्रेला गेले असताना मांसाहार करुन राहुल गांधींनी हिंदूंच्या भावना दुखावल्याची टीका भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केली आहे. हा वाद पेटल्यानंतर हॉटेल व्यवस्थापनानं स्पष्टीकरण देत राहुल गांधींनी शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, अशी माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले राहुल गांधी 31 ऑगस्टला काठमांडूतील वूटू नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. टी-शर्ट आणि जिन्स घालून हॉटेलमध्ये गेलेल्या राहुल यांचा फोटो हॉटेल व्यवस्थापनानं सोशल मीडियावर शेअर केला होता. 'राहुल गांधींनी हॉटेलला सरप्राईज भेट देत नेवारी भोजनाचा आनंद घेतला,' अशी पोस्ट व्यवस्थापनाकडून फेसबुकवर करण्यात आली होती. यानंतर स्थानिक माध्यमांनी राहुल गांधींनी मांसाहारी जेवण घेतल्याचं वृत्त प्रसिद्ध केलं. राहुल यांना चिकन कुरकुरे अतिशय आवडल्याचंदेखील नेपाळी प्रसिद्धी माध्यमांनी वृत्तांकन करताना म्हटलं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. यावरुन भाजपानं राहुल गांधींवर टीकेची झोड उठवली. हिंदूंच्या भावनांचा अपमान करणं राहुल गांधी आणि काँग्रेससाठी नवीन नाही, अशा शब्दांमध्ये भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय राहुल गांधींवर बरसले.

या वादानंतर वूटू रेस्टॉरंटकडून स्पष्टीकरण करण्यात आलं. राहुल गांधींनी फक्त शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं, असं रेस्टॉरंटकडून सांगण्यात आलं. प्रसार माध्यमांनी आमच्याकडून राहुल यांच्या जेवणाविषयी कोणतीही माहिती देण्यात आलेली नव्हती, असंही रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे. 'राहुल गांधींनी कोणते पदार्थ ऑर्डर केले होते, याबद्दल आमच्याकडे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. आम्ही हे स्पष्ट करु इच्छितो की, राहुल गांधी यांनी शुद्ध शाकाहारी पदार्थ मागवले होते,' असं वूटू रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनानं म्हटलं आहे. 
 

Web Title: Did Rahul Gandhi eat non veg food during Kailash Mansarovar Yatra Restaurant clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.