'काँग्रेसचे संघटन कमकुवत आहे, म्हणून जनता मतदान करत नाही'; दिग्गज नेत्याने पक्षाला दाखवला आरसा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 01:51 PM2023-04-20T13:51:47+5:302023-04-20T14:01:16+5:30
'देशातील लोकांना काँग्रेसला मतदान करायचे आहे, पण...'
सिहोर: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. तत्पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पक्षाच्या हायकमांडला आरसा दाखवला आहे. काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचे दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री असेही म्हणाले की, मतदानाच्या दिवशीही काँग्रेसचे निवडणूक व्यवस्थापन कमकुवत असते.
सिहोर येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिग्विजय सिंह म्हणाले की, पक्षाचे संघटन जसे असावे, तसे नाही. हे मान्य करायला आम्हाला काहीच हरकत नाही. मतदानाच्या दिवशीही पक्षाच्या व्यवस्थापनात फार मोठी कमतरता असते. ज्या प्रकारची तयारी करायला हवी, तशी तयारी केली जात नाही. लोकांना आम्हाला मतदान करायचे आहे, परंतु संघटनेच्या कमकुवतपणामुळे ते करू शकत नाहीत, असे दिग्विजय सिंह म्हणाले
मध्य प्रदेशमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. दिग्विजय सिंह 2018 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या जागांवर पक्षाचा पराभव झाला, त्या जागांवर सतत भेटी देत आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अशा 66 जागांची यादी तयार केली आहे. या संदर्भात दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात पोहोचले होते.